आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैष्णवांचा मेळा पंढरीकडे मार्गस्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय रामकृष्णहरी.. असा जयघोष करत माउली आणि तुकोबांचा पालखी सोहळा रविवारी सकाळी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. तुकोबांच्या पालखीने हडपसरहून लोणी काळभोरकडे तर दिवे घाटचा अवघड चढण पार करत माउलींच्या पालखीने दिवे घाटातून सासवडकडे प्रस्थान केले.

तुकोबांची पालखी पुण्यातील नाना पेठेतील मुक्कामाहून सकाळी साडेसहाच्या सुमारास निघाली. त्याचवेळी भवानी पेठेत मुक्कामास असणारी माउलींची पालखीही मार्गस्थ झाली. हडपसरपर्यंत दोन्ही पालख्यांची एकत्रित वाटचाल झाली. दोन्ही पालख्यांचे वारकरी एकत्र येताच विठुनामाचा जयघोष झाला. हडपसरला अल्पोपहार आणि विसावा झाल्यावर दाेन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ झाल्या.

खडतर टप्पा : आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावरचा पुणे ते सासवड हा सर्वांत अवघड टप्पा मानला जातो. संपूर्ण दिवेघाट खड्या चढणीचा आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने कडक उन्हात दिवे घाटाची चढण वारकऱ्यांना पार करावी लागली. त्यामुळे पावसाच्या धारांऐवजी घामाच्या धारा भाविकांना सहन कराव्या लागल्या. तरीही मुखी हरिनाम घोळवत माउलींची पालखी वेळेपूर्वीच दिवेघाट पार करून पुढे निघाली.

‘पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी..’
विठुरायाच्या दर्शनाची अास घेऊन निघालेल्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांनी पुण्याजवळील दिवेघाटची अवघड वाट हरिनाम घेत रविवारी सहज पार केली.