आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्ध वाद्य सारंगीमधून होतेय शतरंगांची उधळण; पंडित रामनारायण यांचे मनोगत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘सारंगी हे सांगीतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध भारतीय वाद्य आहे. ते केवळ आर्त वा करुण वाद्य नाही. उलट सारंगी म्हणजे ‘सौ रंगी’ असा अर्थ आहे. विविध सांगीतिक शक्यता, नव्या वाटांचे रंग खुलवणारी ती सारंगी आहे,’ अशा शब्दांत सारंगीमय जीवन जगणारे ज्येष्ठ कलाकार पंडित रामनारायण यांनी सारंगीमाहात्म्य सांगितले.
पं. रामनारायण यांना ज्येष्ठ संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 51 हजार रुपये आणि चांदीची ट्रॉफी, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी झालेला हा संवाद. हिंदी चित्रपटसृष्टीत ओ. पी. नय्यर यांच्याइतका सारंगी या वाद्याचा खुबीदार वापर क्वचितच कुणी केला असेल, असे मत व्यक्त करून पं. रामनारायण म्हणाले, नय्यर यांचे विशिष्ट ठेक्याचे संगीत लोकप्रिय होते. त्यांनी पाश्चिमात्त्य वाद्यांसह गाण्यांत सारंगीचा अप्रतिम वापर केला. नय्यर यांच्या संगीतातील सारंगी हा या वाद्याचा एक बेमिसाल रंग आहे. सारंगी दु:खी पार्श्वभूमीप्रमाणेच आनंदी आणि रोमँटिक गाण्यांतही त्यांनी अनोख्या पद्धतीने खुलवली. जिज्ञासूंनी कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, मैं प्यार का राही हंू, आज कोयी प्यार से दिल की बाते कह गया, रातों को चोरी चोरी बोले मोरा कंगना...ही गाणी त्यासाठी जरूर अभ्यासावीत.

पूर्वीचे संगीतकारच नाहीत
सुरुवातीला मी साथसंगत करत होतो. फक्त आकाशवाणीवर कार्यक्रम होत असत. बिदागी तुटपुंजी असल्याने मी चित्रपटांसाठी वाजवायला सरुवात केली. पण खर्‍या अर्थाने चित्रपटगीतांनीच या वाद्याच्या अनेक शक्यता रसिकांपर्यंत पोहोचवल्या. अनेक जुन्या गीतांमध्ये सारंगी उत्तम वाजली आहे. मात्र आता तसे संगीतकार, चित्रपट नाहीत, अशी खंतही पंडितजींनी व्यक्त केली.

मी अजून विद्यार्थीच
मी आज 87 वर्षांचा आहे. आजही मैफली करतो. वाद्याच्या 40 तारा जुळवणारा आतल्या आत गातच असतो. पण मी आजही विद्यार्थीच आहे. हे वाद्य जिवंत राहावे असे सरकारलाही वाटत असेल तर त्यांनी मदत करावी, एवढेच मी म्हणू शकतो.
-पं. रामनारायण, प्रसिद्ध सारंगीवादक