आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केल्यास महायुती 250 जागा जिंकेल\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बहुजनांचे नेते अशी ओळख असलेल्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यास महायुती 250 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असे मत महायुतीतील नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी काल चाळीसगाव येथे पंकजा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील असे वक्तव्य केले होते. त्यानंतर जानकर यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पंकजा मुंडेंच्या संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्यातील दुस-या दिवशी संगमनेरमध्ये आज सभा पार पडली. त्यावेळी जानकर बोलत होते. यावेळी खासदार दिलीप गांधी, बबनराव पाचपुते उपस्थित होते. जानकर म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे ख-या अर्थाने बहुजन व दुर्लक्ष घटकांचे नेते होते. त्यांनी या समाजाला धरूनच राजकारण केले. या समाजाशिवाय भले कसे होईल याचेच हित पाहिले. त्यामुळेच अलीकडच्या काळात ज्या एखाद्या नेत्याला लोकांनी स्वीकारले त्यापैकी मुंडेसाहेबांचे नाव सर्वात वर आहे. मुंडेंसाहेबांचा हा वारसा त्यांची कन्या पंकजा समर्थपणे सांभाळतील याबाबत आम्हाला तिळमात्र शंका नाही. विनोद तावडेंच्या वक्तव्याचा आधार घेत जानकर म्हणाले, महायुतीने किंवा भाजपने जर पंकजांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले तर महायुतीला 250 पेक्षा जास्त जागा मिळतील.
पंकजा मुंडें म्हणाल्या, बाबांच्या रूपाने मी सर्वस्व गमावले आहे. आत्ता अजून काय माझ्याकडे राहिले आहे गमवायला? हेलिकॉप्टरवरून सरळ जमिनीवरच आले आणि आत्ता जमिनीवरच राहणार. खूप सहन केले बहुजनानो तुम्ही आणि मी पण आत्ता बस्स!! माझ्या संघर्षापुढे नियतीलाही मी झुकवणार, फक्त तुमची साथ बरोबर राहून दे, असे बेधडक वक्तव्यही पंकजा मुंडेंनी केले आहे.
दरम्यान, आपला राज्यात राहण्यातच कल असून याबाबत 21 सप्टेंबरला आपला निर्णय जाहीर करू असे पंकजांनी म्हटले आहे. राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी काम करण्याची संधी आहे. पण येथील लोकांची नाळ कायम ठेवण्यासाठी मला इथेच काम करावे असे वाटत आहे. असे असले तरी माझ्या कुटुंबियांशी व वरिष्ठांची चर्चा करून 21 ला निर्णय जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. पंकजा परळीतून विधानसभा लढवतील तर, मुंडेंच्या द्वितीय कन्या डॉ. प्रीतम या लोकसभेवर बिनविरोध निवडून जातील अशी चर्चा रंगली आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबातील कोणीही सदस्य निवडणुकीत उभा राहिल्यास राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही अशी जाहीर घोषणा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच केली आहे.