आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील २४ हजार हेक्टर शेती बिल्डरांच्या घशात, पंकजा मुंडे यांचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने बिल्डरांच्या फायद्यासाठी पुणे शहरालगतच्या तब्बल साडेचोवीस हजार हेक्टर शेतजमिनीच्या निवासीकरणाचा घाट घातल्याचा आरोप भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा मुंडे यांनी गुरुवारी केला. बिल्डर लॉबीचे हित जपण्यासाठी राज्य सरकारने नियम वाकवून हा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात नगर नियोजन विभागाकडे आक्षेप नोंदवला असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंकजा मुंडे यांनी सुरू केलेल्या राज्यव्यापी संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा शुक्रवारपासून (ता. १२) चाळीसगावातून सुरू होत आहे. यानिमित्त गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ‘राज्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये दरवर्षी वाढ होत असतानाच शेतजमीन संपवण्याचे प्रयत्न राज्यकर्त्यांकडून सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांत राज्यातली १८ टक्के शेतजमीन कमी झाली आहे. वाढत्या निवासीकरणासाठी अधिक जमिनीची गरज असली तरी असे निर्णय सर्वसामान्यांचे हित लक्षात ठेवून घेण्याची गरज आहे. मूठभर बिल्डरांच्या फायद्यासाठी शेतजमिनी संपवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करू नये,’ असा इशाराही पंकजा यांनी दिला.

गाफील राहणार नाही
‘१९९५मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणातील गुन्हेगारीकरण संपवण्याच्या विरोधात संघर्ष यात्रा काढली. युतीचे सरकार सत्तेत येण्यात या संघर्ष यात्रेचा मोठा वाटा होता. त्याचप्रमाणे यंदाच्या सत्ता परिवर्तनामध्येही माझ्या संघर्ष यात्रेची भूमिका महत्त्वाची असेल,' असा दावा पंकजा यांनी केला. लोकसभेच्या निकालानंतर महायुतीचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी उमेदवार नसतील, हे लक्षात घेऊन गाफील राहण्याची चूक आम्ही करणार नाही. मोदींच्या प्रतिमेवर अवलंबून राहता राज्य सरकारचे अपयश आणि भ्रष्टाचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.

भाजप-शिवसेनेच्या युतीमध्ये रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे यांना सामावून घेणारे गोपीनाथ मुंडे "महायुती'चे शिल्पकार होते. त्यांची पोकळी निश्चितपणे जाणवत आहे. जागावाटपाचा प्रश्न सामोपचाराने मिटवून काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार घालवण्यासाठी महायुतीतील सगळे घटक पक्ष एकजुटीने लढतील, असा विश्वास पंकजा यांनी व्यक्त केला.

- पवार घराण्याचे आम्ही पारंपरिक विरोधक नाहीत. पवारांना मुंडे यांचा असलेला विरोध व्यक्तिसापेक्ष नसून मुद्द्यांवर आधारित आहे.
- धनंजय मुंडे यांनी माझ्या बाबांच्या पराभवासाठी प्रयत्न केले होते. आमची तत्त्वे वेगळी असल्याने भविष्यात राजकीय समेटाची शक्यता नाही. हा विषय आमच्यासाठी संपला.
- कधी ना कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद महिलेने भूषवावे ही माझी इच्छा आहे; मात्र "ती' महिला मीच असावी, असा याचा अर्थ नाही.
- नव्या राज्य सरकारमध्ये मी दिसणारच आहे; परंतु मी मुख्यमंत्रिपदाची दावेदार नाही. महायुतीचा "सीएम' होण्यासाठी माझी संघर्ष यात्रा आहे.
अमित शहा समारोपाला
चाळीसगावातूनसुरू होणार्‍या संघर्ष यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याच्या वेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत, तर १८ सप्टेंबर रोजी चौंडी (जि. नगर) येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. त्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार असल्याची माहिती पंकजा यांनी दिली.