आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोड कामगारांचे नेतृत्व पंकजांकडे? बड्या नेत्यांकडून पंख छाटण्याचे प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्यातील ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या साखर कारखानदारीतील एकहाती वर्चस्वाला आव्हान देणारे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा हा वारसा त्यांच्या कन्या पंकजा मुंडे चालवणार काय, याचा निर्णय काही दिवसांतच होणार आहे. ऊसतोड मजुरांच्या लवादावर पंकजा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटीलही त्यांच्या नावावर अनुकूल आहेत.

राज्यात 7.5 लाख ऊसतोड मजूर आहेत. यातील बहुतांश बीड जिल्ह्यातील आहेत. कामगारांच्या प्रश्नांसाठी कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून पवार व कामगारांचे प्रतिनिधी म्हणून मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लवाद नेमला होता. तीन वर्षांची मुदत संपल्याने लवादाच्या नव्या सदस्यांची नियुक्ती विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी होणार आहे. साखर उद्योगाने व ऊसतोड कामगारांनी पवार-मुंडे लवाद स्वीकारला होता. गेल्या तीन दशकांत मुंडे यांनी कामगारांमध्ये नेतृत्व प्रस्थापित केले होते. प्रामुख्याने नगर व बीड जिल्ह्यातील कामगारांत एकजुट निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आता या कामगारांमध्ये सर्वमान्य नेतृत्व नसल्याने पंकजा यांनी ही उणीव भरून काढावी, असा काहींचा प्रयत्न आहे.

बड्या नेत्यांकडून पंख छाटण्याचे प्रयत्न
कामगारांची इच्छा असल्यास नेतृत्वाची तयारी पंकजा यांनी दाखवली आहे. परंतु या माध्यमातून पंकजा राज्याच्या राजकारणात पाय रोवू शकतात हे पाहून काही बड्या नेत्यांनी त्यांचे नाव पुढे येऊ नये म्हणून प्रयत्न चालवले आहेत.

प्रस्ताव आल्यास विचार
‘गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे त्यांची जागा रिक्त आहे. त्या जागी पंकजा यांच्या नावाची चर्चा अद्याप आमच्यापर्यंत आली नाही. मात्र त्यांची इच्छा असल्यास विचार होऊ शकतो. लवादावर कोणाला घ्यायचे याचा निर्णय अद्याप झालेला नाही.’
- हर्षवर्धन पाटील, सहकारमंत्री.

नेतृत्वाचे राजकारण
ऐन गाळप हंगामात ऊसतोड कामगारांचे संप होतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने 2008 मध्ये प्रथम आणि त्यानंतर 2011 मध्ये पवार-मुंडे लवाद नेमला. कामगारांतील वंजारी समाजाचे प्राबल्य व मुंडे यांचा कडवा पवार विरोध यामुळे मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारले गेले. मुंडेंनीही त्यांची ओळख नेहमी ऊसतोड कामगारांचे नेते अशी करून दिली. डझनभर सहकारी व खासगी कारखान्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मालकी आल्यानंतर मुंडे स्वत: साखरसम्राट झाले. तरीही कामगारांचा मुंडेंवरील विश्वास कायम होता. मुंडे यांनी संधी मिळेल तेव्हा या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रस्थापित साखरसम्राटांना शह दिला.

जबाबदारी स्वीकारेन
लवादावर काम करावे म्हणून कामगार संघटनांचा आग्रह आहे. ऊसतोड मजुरांसाठी मी काम करण्यास तयार आहे. ही जबाबदारी आनंदाने घेईन.
- पंकजा मुंडे, आमदार परळी