आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्यतेसाठी नव्हे, अंतर्मनाच्या शांतीसाठी चित्र काढतो; शंभरी गाठलेले ज्येष्ठ चित्रकार पाठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘मीआजही शैलीच्या शोधात आहे, जी सर्वस्वी माझी असेल. मी अंतर्मनाच्या शांतीसाठी चित्र काढतो. कुठल्याही मानमान्यतेसाठी माझी चित्रे नाहीत. चित्र हे माझ्यासाठी ध्यानासारखे आहे. ते मला विश्रांत करते. कोऱ्या कॅन्व्हाससमोर मी उभा राहतो आणि चित्र माझ्यातून झऱ्यासारखे वाहू लागते..’ वयाची शंभरी पूर्ण करणाऱ्या चित्रकार आर. व्ही. ऊर्फ बाबा पाठक यांनी ‘दिव्य मराठी’कडे या भावना व्यक्त केल्या.

१३ जून १९१५ राेजी तत्कालीन औंध संस्थानातील साताऱ्याच्या परिसरात जन्मलेले बाबा पाठक शतकभराचा प्रदीर्घ अनुभवपट पांघरूण शांतपणे जगत आहेत. वयोमानाने श्रवणशक्ती कमी झाल्याने त्यांच्या कन्या राणी साठे यांनीच बाबांचा जीवनपट उलगडला. ‘वयाच्या ९८ व्या वर्षांपर्यंत ते चित्रे रेखाटत असत. स्वातंत्र्यापूर्वीच्या औंध संस्थानाच्या या भागात पंतप्रतिनिधींसारख्या कर्तबगार, कलाप्रेमी आणि गुणग्राहक संस्थानिकामुळे अनेक चित्रकार-शिल्पकार उदयास आले. देवधर मास्तर, माधवराव सातवळेकर, व्ही. के. पाटील हे बाबा पाठकांचे आद्य कलागुरू. पुढे बाबा बडोद्याला ‘कला भवन’मध्ये दाखल झाले आणि त्यांनी चित्रकारितेतील पदविका प्राप्त केली,’ असे राणी साठे म्हणाल्या.

‘१९४० च्या सुमारास बाबा मुंबईत आले आणि ‘बॉम्बे आर्ट सोसायटी गॅलरी’मध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन गाजले. हा काळ स्वातंत्र्यसमराचा होता आणि त्यापासून अलिप्त राहणे बाबांना शक्य नव्हते. ते पुण्याला आले आणि त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. त्यांच्या नावे वॉरंट निघाल्याने ते काही वर्षे भूमिगत झाले. ते परत आले तेव्हा कलाक्षेत्र झपाट्याने बदलल्याचे त्यांच्या लक्षात आले.’

आर्थिक चणचणीतून सुटका मिळवण्यासाठी बाबांनी स्वत:चे कलाप्रेम, प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता यांचा संगम साधत कोल्ड सिरॅमिक्स आणि म्यूरल्स तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कलाकृती हाँगकाँग, दुबई, सिंगापूर येथेही विराजमान झाल्या. यशाचा हा आलेख चढत असतानाच बाबांना त्यांची मूळ कलाप्रेरणा असणारी चित्रकला खुणावत होती. त्यांनी आपला यशोशिखराकडे जात असलेला व्यवसाय थांबवला आणि चित्रकलेत स्वत:ला गुरफटून घेतले. चित्रकलेवरील प्रेमापोटी ते जगभर फिरले. निसर्गाची नानाविध रूपे त्यांनी चित्रांकित केली. मॉनेट, व्हॉन गॉग, तुलूस लोट्रेक, देगा हे त्यांचे आवडते विदेशी कलाकार, तर भारतीय चित्रकारांमध्ये एन. सी. बेंद्रे यांचे काम त्यांना आवडते. जलरंग, पेस्टल, तैलरंग अशा माध्यमांतून त्यांनी काम केले,’ असे राणी साठे म्हणाल्या.

बाबांनी समताेल ठेवला
साठे म्हणाल्या, ‘सामान्यांप्रमाणेच पारंपरिक चढउतार, हेलकावे बाबांनीही अनुभवले. कला आणि व्यावसायिकता यांच्यात त्यांनी सुवर्णमध्य साधला. कौटुंबिक जगणं आणि व्यावसायिकता यांच्यात समतोल ठेवला. आपलं जगणं, आपलं काम आणि स्वत्व यांच्यातलं अद्वैत जपत आज शताब्दीचा टप्पा पूर्ण केला, याचे समाधान आहे.’

यशासाठी शॉर्टकट नाही
तरुणाईला संदेश काय द्याल? असे विचारता बाबा म्हणतात,‘यशासाठी शॉर्टकट नाही आणि परिश्रमांना पर्याय नाही. कलाकाराने निरीक्षणशक्ती वाढवली पाहिजे. त्यातून त्यांना स्वत:ची शैली गवसेल. कलेला सतत ‘रियाज’ हवा. माझी उत्तम चित्रे ही मी ‘केली’ नसून ती ‘झाली’ अशीच माझी भावना आहे.
बातम्या आणखी आहेत...