आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वन रँक, वन पेन्शन देणारच, पुण्यातील कार्यक्रमात संरक्षणमंत्री पर्रीकरांनी दिला विश्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील सैनिक सन्मान साेहळ्यात गुरुवारी केंद्रीय संरक्षण मंत्री मनाेहर पर्रीकर यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला. - Divya Marathi
पुण्यातील सैनिक सन्मान साेहळ्यात गुरुवारी केंद्रीय संरक्षण मंत्री मनाेहर पर्रीकर यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला.
पुणे - ‘निवृत्त सैनिकांना समान हुद्दा, समान निवृत्तिवेतन (वन रँक, वन पेन्शन) देण्यासाठी आवश्यक निधीची नेमकी रक्कम किती याचा अभ्यास केंद्र सरकारकडून सुरू आहे. याला थोडा वेळ लागणार असला, तरी ‘वन रँक, वन पेन्शन’ देण्यासंदर्भात सरकार ठाम आहे याची सैनिकांनी खात्री बाळगावी, असा शब्द केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी पुण्यात दिला.

१९४७ पासून देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढलेल्या वीरचक्र, महावीरचक्र विजेत्या सैनिकांचा गुरुवारी पर्रीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अध्यक्षस्थानी होते. संस्कृती संवर्धन समिती व पूर्व सैनिक सेवा परिषद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सेवा परिषदेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल व्ही. एम. पाटील, सदर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोकसिंग, खासदार अनिल शिरोळे आदींची उपस्थिती हाेती.

पर्रीकर म्हणाले की, "काँग्रेस अाघाडी सरकारने ‘वन रँक, वन पेन्शन’साठी ५०० कोटी रुपये ठेवले होते. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर यासाठी हजार कोटींची तरतूद करण्यात आली. प्रत्यक्षात लागणारी रक्कम याहीपेक्षा जास्त असल्याचे लक्षात आले आहे. मात्र, कितीही पैसे लागले तरी ‘वन रँक, वन पेन्शन’ अदा करण्यात सरकार कमी पडणार नाही. सैनिकांच्या त्यागाची, बलिदानाची तुलना पैशांमध्ये करता येणार नाही. सरकार त्यांच्याप्रति सदैव कृतज्ञ असेल, एवढा विश्वास मी निवृत्त सैनिकांना देतो.’

अाता जवान मरणार नाहीत
‘माझे जवान यापुढे सीमेवर मरणार नाहीत, तर ते शत्रूला मारतील. आपल्या सैनिकांवर कोणी गोळीबार केला, तर कसलीही फिकीर न करता ‘त्यांना’ संपवा, अशा स्पष्ट सूचना मी सैन्याला दिल्या आहेत. मानवाधिकाराचे उल्लंघन न होऊ देण्याचा प्रयत्न असला पाहिजेच, मात्र त्याचा बाऊ करण्याची गरज नाही. आपल्या सैनिकांचे प्राण महत्त्वाचे,’ असे पर्रीकर म्हणाले.

‘बेबी’ पाहून टाळ्या वाजवल्या
‘सैनिकांच्या वीरकथांचा समावेश शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये केला पाहिजे, असा माझा आग्रह आहे. यासाठी मला कोणी भगवा म्हटले, तरी मी त्याला भीक घालत नाही,’ असे ठणकावतानाच ‘अलीकडेच मी ‘बेबी’ हा सिनेमा पाहिला. यात एका सीनमध्ये अक्षयकुमार दरवाजा लावतो आणि मंत्र्याच्या ‘पीए’ला लाथ घालतो. हा प्रसंग पाहून मी बऱ्याच वर्षांनी मनापासून टाळ्या वाजवल्या,’ असा किस्साही पर्रीकर यांनी सांगितला.

शहीद कुटुंबीयांना अाधार देऊ
‘२१ हजार फुटांवर उणे ६० अंश तापमानात सहा सहा महिने भारतीय सैनिक तैनात राहून सीमेचे रक्षण करतात. या सैनिकांच्या कुटुंबांची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारवर आहे. आमचा एकही सैनिक शहीद होऊ नये हीच आमची इच्छा असते. दुर्दैवाने तसे घडलेच तर मात्र त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक विवंचना भासू नये असा सरकारचा नेहमी प्रयत्न असेल,’ असे पर्रीकर म्हणाले.

विंग कमांडर कर्णिक यांनी नाकारला सत्कार
समान हुद्दा, समान पेन्शन (वन रँक, वन पेन्शन) लागू करण्यास टाळाटाळ हाेत असल्याच्या निषेधार्थ निवृत्त विंग कमांडर सुरेश कर्णिक यांनी गुरुवारी पुण्यात केंद्रीय संरक्षणमंत्री मनाेहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत अायाेजित साेहळ्यात सत्कार स्वीकारण्यास नकार दिला. भारतीय वायुदलात कार्यरत असताना १९७१ च्या युद्धात चमकदार कामगिरी केल्याबद्दल कर्णिक यांना वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात अालेले अाहे. ‘लष्करी जवानांच्या बाबतीत सरकारची भूमिका केवळ घाेषणाबाजीची असून कृती मात्र शून्य अाहे. माजी सैनिकांच्या पेन्शनच्या मुद्द्यावर सरकारकडून टाळाटाळ केली जात अाहे. वरिष्ठ लष्करी अधिकारी या विषयाचे राजकारण करत अाहेत,’ असा अाराेप कर्णिक यांनी माध्यमांशी बाेलताना केला.

जवानांनाे, संयम बाळगा
‘वन रँक, वन पेन्शन’चा मुद्दा देशभर तापला अाहे. या पार्श्वभूमीवर नाैदलाचे प्रमुख अॅडमिरल अार. के. धवन यांनी माजी सैनिकांना संयम बाळगण्याचे अावाहन केले आहे. ‘या विषयावर मार्ग काढण्यासाठी सरकारकडून प्राधान्याने काम सुरू अाहे. अापण स्वत: संरक्षणमंत्र्यांकडे हा मुद्दा उपस्थित केला अाहे. सरकार लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेईल.’
बातम्या आणखी आहेत...