आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Participation Of Female Devotees In Ashadhi Wari To Be Analyzed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता घेतला जाणार वारीतील स्त्री सहभागाचा मागोवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विश्वविख्यात आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यातील स्त्रियांचा सहभाग सातत्याने वाढताना दिसत आहे. या वाढत्या प्रमाणाचे नेमके कारण काय, त्याचे स्वरूप कसे आहे, त्यामागील मानसिकता कशा प्रकारची आहे आदी प्रश्नांचा वेध घेणारा एक आगळावेगळा प्रकल्प ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांनी हाती घेतला असून भारती विश्वविद्यालयाच्या शाश्वती केंद्रातर्फे तो या वर्षीच्या आषाढी वारीपासून साकारणार आहे.
आषाढी वारीला सात शतकांहून मोठी परंपरा आहे. वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि पारमार्थिक क्षेत्रातला एक चमत्कार आहे. वारीतील सर्वसमावेशकता, तिची लवचीकता, तिची सार्वत्रिक आवाहकता यांचा विचार करता शेकडो वर्षे महाराष्ट्रात सुरू असलेली ही एक आश्चर्यकारक परंपरा मानली जाते. या परंपरेतील स्त्री सहभागाचे प्रमाण वाढते असून त्याची कारणमीमांसा करण्याचा एक प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे.
उपक्रमाच्या प्रवर्तक डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, वारीत आज सुमारे पावणेचारशे दिंड्यांचा सहभाग असतो. प्रत्येक दिंडीत सुमारे पाचशे ते तीन हजारांपर्यंत वारकरी असतात. शिवाय दिंडीत सामील न होता वारीसोबत चालणारेही शेकडो जण असतात. हे सर्व मिळून वारीतला समुदाय चार ते पाच लाखांचा असतो. ही माणसे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश येथूनही आलेली असतात. तेथील काही दिंड्याही येथे येतात. वारीचे सर्व काम स्वयंशासित आणि लोकाधारित असते. त्यात स्त्रियांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात असतो. दिवसेंदिवस तो वाढत चालला आहे. हा सहभाग वेगवेगळ्या पातळ्यांवरील आहे. तो वारकरी म्हणून जसा आहे, तसाच सेवा, व्यवस्थापन, उद्योग आणि वैयक्तिक पातळीवरचाही आहे. तो सुशिक्षित, नागरी आहे तसाच अशिक्षित ग्रामीणही आहे. स्त्रियांच्या या सहभागाची नोंद सामाजिक-सांस्कृतिक दृष्टीने होणे आवश्यक आहे, असे वाटल्याने हा प्रकल्प सुरू केला आहे. वारीतील प्रत्यक्ष स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित असेच या प्रकल्पाचे स्वरूप असेल. त्यासाठी समाजशास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी, सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. वारी पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतून जात असल्याने तेथील स्त्रियांचा सहभागही अभ्यासला जाणार आहे. यामुळे स्त्रियांच्या सहभागाविषयी माहिती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच यानंतर वारीत सहभाग घेण्यासाठी उत्साह वाढेल, असे या क्षेत्रातील जाणकारांना वाटते.