आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pawar Sir Is My Good Friend, Due To Him I Became Minister Ramdas Athwale

पवारसाहेब माझे चांगले मित्र, त्यांच्यामुळेच मी मंत्री झालो- रामदास आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘पवार साहेब माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्यामुळेच मी मंत्री झालो. त्यांच्याकडूनच मी राजकारण शिकलो,’ असे स्मरणरंजन रामदास आठवले यांनी केले. त्यावर ‘आठवलेंना जुन्या दिवसांचे स्मरण झालेले दिसते. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करू इच्छितो,’ अशी फिरकी शरद पवारांनी घेतली. त्यावर कडी करताना आठवले म्हणाले, ‘येत्या निवडणुकीनंतर केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे काँग्रेसचे सरकार पराभूत होणार आहे. त्यामुळे पवारांनाच मी रालोआ आघाडीत आणणार आहे.’
पुणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन शुक्रवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून रामदास आठवले उपस्थित होते. या वेळी झालेल्या कार्यक्रमात आठवले-पवार चांगलीच जुगलबंदी रंगली.
उचापती मंत्री कामाचे : ‘उचापती, चळवळी करणार्‍या मंडळींना मंत्रिमंडळात घेतले तर मुख्यमंत्र्यांना नीट काम करता येते ही भूमिका ठेवून आठवलेंना पहिल्यांदा मंत्रिमंडळात घेतले होते,’ असे पवार म्हणताच आठवलेंनाही हसू आवरले नाही. ‘विधिमंडळाचे सभासद नसतानाही आठवले मंत्री झाले. समाजकल्याणमंत्री म्हणून त्यांनी जेवढे काम केले तेवढे कोणीच केले नाही,’ असे कौतुकही पवारांनी केले.
पवारांनाच सोबत घेऊ : पवारांच्या इशार्‍याबद्दल पत्रकारांनी विचारले तेव्हा आठवले म्हणाले, ‘पवारांच्या सहानुभूतीबद्दल आभारी आहे. मात्र, काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचा कोणताही विचार नाही. त्यांचे सरकार आता येणारच नसल्याने तिकडे जाऊन काय करू? रालोआला काही जागा कमी पडल्या तर मी ‘राष्ट्रवादी’लाच इकडे आणण्याचा प्रयत्न करणार आहे.’
‘पवार चांगले बॅट्समन असले तरी मीही चांगला बॉलर आहे. सिद्धार्थ कॉलेजच्या होस्टेलवरून पवारांनीच मला थेट मंत्रिमंडळात घेतले. आता पवार राज्यसभेच्या सभागृहात बसणार आहेत. माझाही या सभागृहात नंबर लागतो की नाही बघू,’ असे विधान करून आठवले यांनी हशा पिकवला.
‘काँग्रेसबरोबर होतात तेव्हाच तुम्ही खासदार झाले होते,’ असे सांगत पवार म्हणाले, ‘आठवले आमचे मित्र आहेत. काँग्रेसबरोबर गेल्यावरच संसदेत जाता येते हा त्यांचा पूर्वीचा अनुभव आहे. जुन्या दिवसांचे त्यांना स्मरण झालेले दिसते. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करू इच्छितो,’ असे पवार म्हणाले.