(छायाचित्र: नितीन गडकरी)
नागपूर- केंद्रीय मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी दिलेले लेखी आश्वासन पाळत नसल्याच्या निषेधार्थ नागपूरसह विदर्भातील नागरिकांनी आज दुपारी त्यांच्या नागपूरातील गडकरी वाड्यावर आंदोलन मोर्चा काढला. विदर्भ राज्य समितीने या मोर्चाचे आयोजन केले होते. मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर स्वतंत्र विदर्भाचा विषय मार्गी लावू असे भाजप व नितीन गडकरींनी आश्वासन दिले होते. मात्र, त्याबाबत भाजपचे नेते कोणतेही हालचाल करताना दिसत नाही त्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, भाजप अथवा नितीन गडकरी यांनी याबाबत कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच मोर्चातील सहभागी लोकांना अद्याप काहीही आश्वासन दिले नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाची मागणी करणा-या लोकांत नाराजी आहे. याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत काही प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी अनेक दशकापासून सुरु आहे. विदर्भातील लोकांच्या भावना याबाबत तीव्र आहेत. मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा सध्याच्या राज्यावर प्रभाव व सत्ता आहे, असा कायम विदर्भकरांचा सूर आहे. नेमकी हीच नस ओळखत भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्याला पाठिंबा दिला होता. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून भाजपचे सरकार सत्तेस आल्यास स्वतंत्र राज्याला पहिले प्राधान्य असेल असे नितीन गडकरींसह भाजप नेत्यांनी लोकांना आश्वासन दिले होते. त्यामुळे विदर्भातील सर्वच्या सर्व 10 लोकसभा जागांवर भाजप-शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. तसेच केंद्रात मोदी सरकार आल्याने व या सरकारमध्ये गडकरींना मोठे महत्त्व असल्याने विदर्भातील लोकांनी आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज दुपारी 12 च्या सुमारास त्यांच्या नागपूरमधील वाड्यावर भव्य आंदोलन मोर्चा काढला आहे.
पुढे वाचा, नागपूरात शिवसेना महिला कार्यकर्तीची हत्या...