आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pimpari chinchavad Municipal Corporation Election

पिंपरी-चिंचवड महापालिका : बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पुढील महिन्यात होऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीकडे लागले असले तरी त्याला एक महानगरपालिका मात्र अपवाद आहे ती म्हणजे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका. याचे कारण हे की राज्यातील एकमेव अशी ही महानगरपालिका आहे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बहुमताने सत्तेत आहे. तेही दोन तृतीअंश बहुमताने. येत्या निवडणुकीतही इतर पक्षांना कोणतीही संधी नाही, हे संबंधित पक्षांच्या नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस व मनसेचा एकही राज्यस्तरीय नेता पिंपरीकडे फिरकला नाही, किंबहुना फारसे लक्षही घालत नाही. पिंपरी-चिंचवड पालिकेत सध्या १०५ नगरसेवक आहेत. नव्या जनगणनेनुसार ही संख्या आता १२८ झाली आहे. १०५ पैकी राष्ट्रवादीकडे सुमारे ७० नगरसेवक आहेत. तर ऊर्वरित काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि आरपीआय या चार पक्षांकडे मिळून फक्त ३५ नगरसेवक आहेत. पण सध्या राष्ट्रवादीला साधे आव्हान देईल अशी एकाही पक्षाची स्थिती नाही. राष्ट्रवादी पक्ष पिंपरीत बहुमताने सत्तेत असल्याने त्यांनी चांगली कामे केली, पण टक्केवारीचे राजकारण करीत. अर्थात पिंपरी शहर नियोजनबद्ध पद्धतीने वसविले गेले असल्याने पुण्यापेक्षाही येथे चांगल्या पायाभूत सुविधा पाहायला मिळतात. अनेक मोठे उद्योगधंदे असल्याने पालिकेचे उत्पन्नही मोठे आहे. पालिकेचा अर्थसंकल्प सुमारे २२०० कोटीचा असल्यामुळे व त्या तुलनेत शहराचे क्षेत्रफळ मर्यादित असल्याने चांगला विकास करता आला. हे शहर पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात होते त्यामुळे पिंपरीत पहिल्यापासून पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे येथे विरोधक कायमच कमकुवत राहिले. पिंपरी शहर सध्या संपूर्ण राष्ट्रवादीमय आहे. त्यातच पक्षात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरीची शक्यता आहे. निम्म्या प्रभागात तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगेल, अशी चिन्हे आहेत. पण सध्याची स्थिती पाहता पिंपरी पालिकेच्या चाव्या पु्न्हा एकदा राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर - आता पुन्हा एखदा निवडणुक होत असून
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा एकदा सहज येणार असे स्पष्ट दिसून येत आहे. उत्सुकता एवढीच आहे की राष्ट्रवादी पालिकेत आपल्या नगरसेवकांची संख्या शतकापर्यत नेणार का? पिंपरी शहरात विरोधक नावालाच असून आताच्या निवडणुकीतही त्यांची ताकद नगण्य असल्याचे दिसत आहे. पिंपरी शहर सध्या राष्ट्रवादीमय झाले आहे, पक्षाची ताकदही मोठी आहे. पण याचाच फटका पक्षाला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात राष्ट्रवादीतील इच्छुकांची संख्या मोठी आहे. १२८ जागेसाठी ६०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी अर्ज नेले आहेत. त्यातील इच्छुकांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १३ व १४ जानेवारीला घेतल्या. राष्ट्रवादीतील सर्वच इच्छुक मोठ्या ताकदीचे आहेत. त्यामुळे पक्षाचीच डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक जागेसाठी किमान तीन-चार इच्छुक उमेदवार तुल्यबळ आहेत. त्यामुळे तिकीट कोणाला द्यायचे, असा प्रश्न स्थानिक नेत्यांना पडला आहे. काहीही केले तरी बंडखोरी मोठ्या प्रमाणात होणार हे आताच उघड झाले आहे. अजितदादांनी मुलाखती घेतल्या असल्या तरी पक्षाचे तीन आमदार व शहराध्यक्ष या चौकडीला विचारत घेतल्याशिवाय तिकीट वाटप करणे शक्य नाही. आमदार लक्ष्मण जगताप यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातील, विलास लांडे यांना भोसरी मतदारसंघातील तर, पिंपरी व निगडी-प्राधिकरणातील उमेदवाराची निवड शहराध्यक्ष आझम पानसरे यांच्यामार्फत होईल, असे दिसते. पिंपरी शहरातील राजकारण हे नाती-गोत्यावर बरेचसे अंवलबून आहे. त्यामुळे हे नेते आपापल्या समर्थकांना वेगवेगळ्या भागातील प्रभागात उमेदवारी देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच बंडखोरी व पाडापाडीचे राजकारण होणार हे उघड आहे. त्याचाच फटका पक्षाला बसू शकतो. शहरातील निम्या जागांवर तर राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी असाच सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे. पक्षातील इच्छुक उमेदवार कोणाचेही ऐकण्याची मन:स्थितीत नाहीत. अजित पवारांनी मुलाखती घेतल्या त्यावेळी बहुतेकांनी मिरवणूक काढत आपले 'शक्ती'प्रदर्शन केले होते. त्यातच प्रत्येक इच्छुक कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच असे म्हणत आहे. त्यामुळे पक्षात बंडखोरीची मोठी लागण होणार हे दिसून येत आहे. या बंडखोरांना रोखण्यात आमदारांना अपयश येणार आहे. कारण दोन आमदार हे बंडखोरी करुनच निवडून आलेले आहेत आणि आता त्यांचेच सर्वात जास्त कार्यकर्ते बंडखोरी करणार आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना व कार्यकर्त्यांची समजूत काढताना या आमदारांचाही घाम फुटणार आहे.
काँग्रेसला उमेदवारच मिळेना - देशात व राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस
पक्षाची स्थिती या शहरात फारच बिकट झाली आहे. मागील पंधरवड्यात पक्षाच्या काही नगरसेवकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आज पक्षाला तेथे उमेदवारही मिळत नाहीत. निर्धारित वेळेत अर्ज न गेल्याने पक्षावर त्याची मुदत वाढविण्याची नामुष्की ओढावली. त्यावरुन त्या पक्षाची गत लक्षात यावी. सध्या पक्षाचे पालिकेत १९ नगरसेवक आहेत. पण येत्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या दुहेरीही राहील की नाही याबाबत पक्षच साशंक आहे.
महायुतीला फारशी संधी नाही - सध्या पालिकेत भाजपचे ९ तर शिवसेनेचे ५
नगरसेवक आहेत. शहरात आरपीआय (आठवले गट)चा एकमेव नगरसेवक आहे. राज्यपातळीवर आरपीआयची भाजप-सेनेशी महायुती झाल्याने त्यांच्या मतदार टक्केवारीत वाढ होईल. पण एकूणच शहरात महायुतीला फारशी संधी राहणार नाही. त्यातही सेना यंदा भाजपला वरचढ ठरण्याची शक्यता आहे. कारण मागील काळात सेनेत दोन चांगले स्थानिक नेते दाखल झाले आहेत. तत्कालीन काँग्रेसचे शहराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक श्रीरंग बारणे, उद्योजक व भोसरी परिसरातील उमेश चांदगुडे यांनी सेनेत प्रवेश केला. या दोघांनी पक्ष संघटनेवर भर दिला आहे. बारणे यांचे चिंचवड भागात वजन आहे तर, चांदगुडे यांचा भोसरी परिसरात चांगला जम आहे. त्याचा फायदा सेनेला होईल असे दिसते. त्यामुळे सेनेचा पालिकेतला टक्का वाढणार असून, आपला ५ चा आकडा २० पर्यंत जाईल, असे दिसून येत आहे. दुसरीकडे भाजपची स्थिती शहरात मरणासन्न आहे. पुण्याप्रमाणेच पिंपरीतही गडकरी-मुंडे गटात वाद आहे. पिंपरीत मुंडे गटाची ताकत मोठी आहे. पण शहराध्यक्ष एकनाथ पवार हे गडकरी गटाचे आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम तिकिट वाटपावर व पर्यायाने निकालावर दिसून येईल.
मनसेचे कार्यकर्ते नाराज- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पिंपरी शहरात
फारशी संधी नाही. पण शहरातील पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसेची लेखी परीक्षा दिली होती. राज ठाकरे यांनी मागील आठवड्यात पुण्यात पुणे व पिंपरी पालिकासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. पिंपरीतील इच्छुकांच्या मुलाखतीही पुण्यात घेण्यात आल्या. खरे तर राज ठाकरे यांनी पिंपरीत येऊन मुलाखती घ्याव्यात असे पक्षातील नेत्यांना वाटत होते. पण राज यांनी पिंपरीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण होण्याऐवजी नाराजीच आहे. पण पिंपरीत मनसेला फारशी संधी नसल्याचे पाहून पक्के राजकीय 'भान' असलेल्या राज ठाकरेंनी याला फार महत्त्व दिले नाही. तरीही पक्ष पिंपरीत खाते नक्की खोलेल, असे पक्षातील कार्यकर्त्यांना विश्वास आहे.
(ajay.gorad@dainikbhaskar.com)