आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pimpari Chinchvad Commissioner Dr.Shrikar Pradeshi Transfer Issue At Pune

बदलीचे पडसाद: परदेशींना घालवणार्‍यांना निवडून देऊ नका- अण्णा हजारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुणे- ‘पिंपरी-चिंचवड मनपाचे कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली करणार्‍यांना निवडून देऊ नका. चांगले अधिकारी बदलले जात आहेत. याविरोधात जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे,’ असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी केले. दरम्यान, डॉ. परदेशी यांनी सोमवारी आयुक्तपदाची सूत्रे नवे आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे सोपवली.

चार दिवसांपूर्वी परदेशी यांच्या बदलीचे वृत्त पिंपरी - चिंचवडमध्ये धडकले. तेव्हापासून या बदलीच्या विरोधात अनेक संघटनांनी वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठवण्यास सुरुवात केली. ‘परदेशी वाचवा’ मोहिमेला सुरुवातीला मिळालेला प्रतिसाद आता घटत चालल्याचे चित्र दिसत आहे. पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनीच उत्स्फूर्तपणे तीव्र आंदोलन सुरू न केल्याने हजारे यांनीही सावध भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.

‘डॉ. परदेशी यांच्या बदलीचा निर्णय मागे घेण्यासाठी तुम्ही स्वत: आंदोलनात उतरणार का, मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात विचारणार का?’, या प्रश्नावर हजारे यांनी थेट उत्तर देणे टाळले. जनतेने परदेशी यांच्या बदलीचा विचार केला पाहिजे,’ असे ते म्हणाले.

भरपाईची मागणी
डॉ. परदेशीसह इतर अधिकार्‍यांच्या बदल्यांसंदर्भात वस्तुस्थिती नागरिकांना कळवणे आवश्यक होते. अधिकार्‍यांच्या मुदतपूर्व बदलीचा परिणाम नागरिकांवर होत असतो. असे निर्णय म्हणजे राज्य शासनाचा प्रशासनिक निर्णय असतो. असे निर्णय जाहीर करताना संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाने माहिती अधिकार अधिनियमातील कलमांन्वये वस्तुस्थिती प्रसिद्ध करायची असते. तसेच प्रशासनिक निर्णयाची कारणे बाधित व्यक्तींना कळवायची असतात. डॉ. परदेशी प्रकरणी या कलमांचा भंग झाला असल्याची तक्रार ज्येष्ठ ‘आरटीआय’ कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.

0 डॉ. परदेशी यांनी बेकायदा बांधकामांविरोधात कठोर कारवाई सुरू केल्यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी देणारे निनावी पत्रही आले होते. मात्र त्यांनी त्याला भीक घातली नव्हती.

0 डॉ. परदेशी यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी सोमवारीही पिंपरी चिंचवड परिसरात सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून सरकारचा निषेध केला.

परदेशींचा जाता जाताही झटका
राष्ट्रवादीच्या दबावानंतरही ‘मॅनेज’ न झाल्यामुळे डॉ. परदेशींची बदली करण्यात आली. मात्र, कर्तव्यकठोर परदेशींनी जाता-जाता शेवटच्या दिवशीही पालिकेतल्या भ्रष्ट अधिकार्‍यांना झटका दिलाच. गैरकारभारावरून महापालिकेच्या विद्युत विभागातील तीन अधिकार्‍यांना निलंबित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इतर 13 अधिकार्‍यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही दिले. गेल्या 18 महिन्यांच्या अल्पावधीत त्यांनी एकूण 33 कर्मचार्‍यांना निलंबित केले, तर 70 अधिकार्‍यांविरुद्ध खातेनिहाय चौकशीचा बडगा उगारला.