आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटवण्यास विरोध; पिंपरीत जमावाची दगडफेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे सध्या सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईला शनिवारी हिंसक वळण लागले. कारवाई सुरू असतानाच जमावाने दगडफेक करून दहा बस फोडल्या, टायरही पेटवून दिले. तर काही ठिकाणी महिलांनीही कारवाईला विरोध केला. या प्रकरणी पोलिसांनी स्थानिक नगरसेवकांसह भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष एकनाथ पवार, मारुती भापकर आदींना ताब्यात घेतले.
डॉ. श्रीकर परदेशी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्यापासून या भागातील बेकायदा बांधकामावर धडक कारवाई सुरू केली आहे. अनेक नगरसेवक व राजकीय नेत्यांनी त्यांच्या या कारवाईला विरोध केला असला तरी त्यांची तमा न बाळगता परदेशींची ही मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
अनेक ठिकाणी कारवाईला विरोध केला जात आहे. गेल्या आठवड्यात दिघीमधील कारवाईच्या वेळीही महापालिकेच्या पथकावर दगडफेक झाली होती. शनिवारी तळवडे आणि वाल्हेकरवाडी येथे अतिक्रमण पथकाची कारवाई सुरू होती. त्याला विरोध करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या साहाय्याने रास्ता रोको केले. काहींनी दगडफेक केली. प्रामुख्याने अनधिकृत व्यापारी संकुलांवर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. अखेर पोलिस बंदोबस्त वाढवून पालिकेच्या कर्मचाºयांनी कारवाई केली.