आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 दिवसांची झुंज अपयशी: \'त्या\' मुलीचा अखेर मृत्यू, PI, PSI निलंबित!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- परिसरातील तरूणांकडून सातत्याने होण-या छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या भोसरीतील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अखेर मृत्यू झाला आहे. 12 दिवसापासून रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या तरूणीचा रविवारी रात्री उशिरा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मागील आठवड्यात सदर अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वेळीच पालकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने तिला रूग्णालयात दाखल केले होते. तिच्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात उपचार सुरु होते. मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर चांगल्या दर्जाचे उपचार होणे आवश्यक होते. मात्र मुलींच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिला वेळेत चांगले उपचार मिळू शकले नाहीत.
दरम्यान, दोन दिवसापूर्वी संबंधित मुलीच्या उपचारासाठी शिवसेनेच्यावतीने 25 हजारांची मदत देण्यात आली होती. यापुढेही मुलीच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत देण्याचीही भूमिका आहे असे शिवसेनेच्या महापालिकेतील गटनेत्या सुलभा उबाळे यांनी म्हटले होते. मात्र, अखेर या मुलीचा मृत्यू झाला आहे.

या अल्पवयीन मुलीची छेड काढणा-या तीन तरूणांना पोलिसांनी अटक केली आहे. बाबू नायक, सचिन चव्हाण आणि अकीब शेख अशी या आरोपींची नावे आहेत. हे तीन तरूण तिला छेडत असत. याबाबत संबंधित मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आरोपींसह दोषी पोलिस कर्मचा-यांवर कारवाई करण्याची मागणी मुलीच्या पालकांनी केली आहे. दरम्यान, आज दुपारी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पीआय आणि पीएसआय यांचे निलंबन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत.