आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीपाल सबनीसांची दिलगिरी, पी डी पाटलांनी सूत्रे हातात घेताच वाद मिटवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचे धनी बनलेले आगामी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मोदी यांच्याबाबत माझ्या तोंडून गेलेले एकेरी शब्द मी मागे घेतो असे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकला. पिंपरीतील 89 व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी पाटील यांनी सबनीस यांनी वाद मिटविण्याबाबत पुढाकार घ्यावा असे आवाहन केले होते. त्यानुसार सबनीस यांनी या वादावर पडदा टाकला आहे.
सबनीस म्हणाले, मी पंतप्रधान मोदींचा कोणताही अवमान केला नव्हता. मी त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणाबाबत गौरवच करीत होतो. मात्र माझ्या तोंडून त्यांचा एकेरी उल्लेख झाला. माझ्या या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते शब्द काढून टाकतो. मी मोदींसाहेबांचा अवमान केला नाही किंवा करायचा माझा हेतूही नाही. मी जे काही बोललो ते भावनेपोटी बोलले व ते माझे मत आहे, त्यावर मी ठामही आहे. पण माझ्या वक्तव्यामुळे कोणीच्या भावना दुखावल्या आहेत तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे सबनीस यांनी सांगितले.
श्रीपाल सबनीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही दिलगिरी व्यक्त केली. त्याआधी गेल्या वर्षी पंजाबमधील घुमान येथे पार पडलेल्या 88 व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांच्याकडून आगामी पिंपरीतील 89 व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी पाटील यांनी आज दुपारी सूत्रे हाती घेतली.
पी डी पाटील यांनी स्वागताध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि भाजप यांच्यादरम्यान सुरु असलेल्या वाद सोडविण्यासाठी पाऊल उचलले. पी. डी. पाटील यांनी सबनीस यांचे सोमवारीच कान टोचले होते. सबनीस यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच वाद निर्माण झाला आहे. आयुष्यात एकदाच संमेलनाध्यक्ष होता येते हे लक्षात ठेवले पाहिजे, असे सांगत सबनीस यांनीच पुढाकार घेऊन वाद मिटवावा अशी शब्दांत पीडींनी सबनीसांचे कान टोचले होते.
संत नामदेवांचे वास्तव्य असणार्‍या पंजाबातील घुमान येथे 88 वे ऐतिहासिक साहित्य संमेलनाचा आदर्श डोळ्यांपुढे ठेऊनच पिंपरीतले 89वे साहित्य संमेलय यशस्वीरित्या पार पाडू, असा आत्मविश्‍वास स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केला. आपण स्वत: घुमानच्या साहित्य संमेलनास गेलो होतो, असे सांगून डॉ. पाटील म्हणाले की, देसडला आणि नहार यांनी घुमान संमेलन अतिशय वेगळे आणि धाडसी पद्धतीने केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे, अशा शब्दांत त्या दोघांचे पाटील यांनी कौतूक केले. साहित्य संमेलनाच्या गेल्या 138 वर्षांच्या इतिहासात मावळत्या स्वागताध्यक्षाकडून सूत्रे हाती घेण्याचा हा पहिलाच ऐतिहासिक सोहळा झाला.

स्वागताध्यक्षांबाबत ‘ज्ञानयात्री’माहितीपट-
89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वगताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्यावर ‘ज्ञानयात्री’ हा दहा मिनिटांचा दृकश्राव्य माहितीपट अरूण नाईक यांनी त्यांच्या ऊर्जा क्रिएशन या संस्थेतर्फे बनवला आहे. संमेलनातील उद्घाटन सोहळ्यात या माहितीपटाची डीव्हीडी प्रकाशित करण्यात येणार आहे. ‘ज्ञानयात्री’मध्ये डॉ. पाटील यांच्या परिचयाबरोबरच त्यांची संमेलनामागची भूमिका मांडण्यात आली आहे. तसेच संमेलनाच्या आयोजनातील विकासाचे टप्पे यांचा धावता आढावा घेतला आहे. संमेलनाच्या आयोजनातील हा एक दृकश्राव्य दस्तऐवज असून भविष्यातील आयोजक आणि अभ्यासकांनाही तो नक्कीच उपयोगी ठरेल असे अरूण नाईक यांनी सांगितले.