पुणे- ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्यांचा शोध घेण्यासाठी तत्कालिन पोलिस आयुक्त गुलाब पोळ व पुणे पोलिसांनी प्लॅँचेट केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त महासंचालकांना दिले असून दोषी आढळणार्यांवर कारवाई केली जाईल,’ अशी माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी शुक्रवारी दिली.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे तळजाई टेकडी येथे आयोजित कार्यक्रमासाठी पाटील पुण्यात आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, प्लॅँचेट प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय पोलिस अधिकार्यांकडून सुरू असून ती नि:ष्पक्षपातीपणे केली जाईल. आठवड्याभरात त्याचा अहवाल प्राप्त होईल. जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे त्यात आढळल्यास दोषींवर कारवाई केली जाईल.
पोलिस तपासात प्लॅँचेटसारख्या माध्यमाचा वापर खपवून घेतला जाणार नाही. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आला असला तरी तो, महाराष्ट्र पोलिसांकडूनच सुरूच राहील. आमच्यासमोर ते आव्हान आहे, अशी कबूलीही पाटील यांनी दिली.