आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Planned Sikkim Governor Srinivas Facilited In Pune

सिक्कीमचे नियोजित राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा पुण्‍यात सत्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - विद्यार्थिदशेत पुण्याचे गल्लीबोळ सायकलवरून पालथे घालणारे, कलेक्टर असतानाही एस.टी.तून फिरणारे, पंढरीच्या विठोबापाशी आणि नारायणगावच्या विठाबाईच्या तमाशात रंगणारे, नाटकांमध्ये काम करणारे, नृत्य स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावणारे, सतत माणसांत रमणारे पिळदार मिशांचे आणि रांगड्या देहयष्टीचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील नागरी सत्काराच्या निमित्ताने पुणेकरांनी दाखवलेले प्रेम पाहून भारावून गेले होते.


सिक्कीमचे राज्यपाल म्हणून श्रीनिवास पाटील यांचा 20 जुलैला शपथविधी होणार आहे. याबाबतची घोषणा नुकतीच राष्‍ट्रपती भवनातून करण्यात आली. तत्पूर्र्वी पुणेकरांतर्फे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते पाटील यांना पुणेरी पगडी, मानपत्र, शाल, श्रीफळ देण्यात आले. ‘सिक्कीममध्ये तमाशाचा फड नसतो आणि उसाचाही. सह्याद्रीच्या पायथ्याला वाढलेला आणि सदैव माणसांमध्ये असलेला हा माणूस हिमालयाच्या सावलीत रमेल का,’ असा प्रश्न अंकुश काकडे यांनी प्रास्ताविकात उपस्थित केला. साहित्यिक, कलावंत, निवेदक सुधीर गाडगीळ यांनी या वेळी पाटील यांची छोटेखानी मुलाखतही घेतली. ‘‘सह्याद्रीच्या पायथ्याला कृष्णा-कोयनेच्या पाण्यावर आणि यशवंतराव चव्हाणांच्या भाषणावर पोसलो. आई जात्यावरची गाणी सुंदर म्हणायची. ती उखाणेसुद्धा छान घ्यायची. पुरुषोत्तम गोखले, धुंडामहाराज देगलूरकर, अण्णाभाऊ साठे यांची भाषा लहानपणापासून कानावर पडली. यातूनच माझ्यावर भाषेचे संस्कार झाले. सिक्कीमला जाताना एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू अशी आपली अवस्था आहे. ’ असे पाटील म्हणाले.राष्ट्रवादी-काँग्रेस-भाजपचे स्थानिक पदाधिकारी, आमदार-खासदार, अधिकारी, पत्रकार मान्यवरांनी या कार्यक्रमास गर्दी केली होती.