आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Plantation At Holkarwadi In The Memory Of Nanasaheb Dharmadhikari

महाराष्‍ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्‍या पुण्‍यस्‍मरणदिनी होणार 6 हजार वृक्षांची लागवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्‍ट्रभूषण डॉ. नारायण विष्‍णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्‍या पुण्‍यस्‍मरण दिनानिमित्त दत्तात्रेय नारायण तथा आप्‍पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्‍या मागदर्शनाखाली सोमवार, दि. 8 जुलै रोजी होळकरवाडी येथील गायरानातील 30 एकरांत 6 हजार वृक्ष लागवडीचा दुसरा टप्‍पा हाती घेण्‍यात येणार आहे. कार्यक्रमास जिल्‍हाभरातून सुमारे लाखाच्‍यावर श्रीसदस्‍य उपस्थित राहतील, अशी माहिती होळकरवाडी ग्रामपंचायतीच्‍यावतीने देण्‍यात आली.

श्री. सचिन धर्माधिकारी यांच्‍याहस्‍ते या कार्यक्रमाचे उद्‍घाटन होणार आहे. याप्रसंगी वनमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, राज्‍यमंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विजय शिवथरे, महापौर वैशाली बनकर, जिल्‍हाधिकारी विकास देशमूख आणि इतर अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. गतवर्षी (8 जुलै 2012) होळकरवाडीच्‍या डोंगरावर पहिल्‍या टप्‍यात लावण्‍यात आलेल्‍या 6 हजार वृक्षांचे जतन नियमितपणे केले जात आहे. त्‍यात आपटा, चिंच, कडुनिंब, जांभूळ, बांबू आदी फलदायी व वनौषधी वृक्षांचा समावेश आहे.

केवळ वृक्षारोपण नव्‍हे तर त्‍यांचे सवंर्धन करणे हा कार्यक्रमामागचा उदात्त हेतू असून महाराष्‍ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्‍या पुण्‍यस्‍मरण दिनानिमित्त संपूर्ण भारतभर हा सामाजिक उपक्रम आप्‍पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे. विविध प्रकारची रोपटी उपलब्‍ध करून देण्‍यात वन विभागाचा मोलाचा वाटा आहे. आतापर्यंत पुणे शहर व परिसरातील धनकवडी, तुळजाई पठार, वारजे, सुतारदरा, गुजरवाडी, होळकरवाडी, कुडजे, खडकवासला, खानापूर, पिरंगूट, कुळे, भुकूम तसेच जिल्‍ह्यातील जवळपास सर्वच तालुक्‍यांत ही मोहीम यशस्‍वीपणे राबवण्‍यात आली आहे. या मोहिमेस समाजातील सर्वच स्‍तरांतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.