आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Please Keep Transferency In Work, Ajit Pawar Urged To Party Workers

कृपा करून कामात पारदर्शीपणा जपा, अजित पवारांची स्वपक्षीयांना विनंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - 'कृपा करून माझ्यासह सर्वांनी काम करताना पारदर्शकता जपावी. पक्षाची बदनामी होणार नाही याची खबरदारी घ्या,’ अशी विनंती चक्क राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी रविवारी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संमेलनाच्या समारोपसत्रात ते बोलत होते. भ्रष्टाचाराचे आरोप व बेधडक वक्तव्यामुळे अनेकदा अडचणीत आलेल्या अजितदादांची नरमाई मात्र काही क्षणापुरतीच टिकली. फडणवीस सरकारला येत्या काळात सळो की पळो करून सोडणार असल्याचा इशारा पवारांनी दिला. ‘नव्या सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे, अशी मानसिकता सुरुवातीला होती. परंतु तीन महिने झालेत. सरकार सत्तेत आल्यापासून खराब स्थिती निर्माण झाली आहे. त्या विरोधात येत्या अधिवेशनात आवाज उठवू. प्रसंगी अटक करून घेऊ त्याशिवाय कार्यकर्त्यांनाही हुरूप येणार नाही’, असे पवार म्हणाले.

आर. आर. पाटील अन‌् तंबाखू
‘राष्ट्रवादी'चे ज्येष्ठ नेते आर. आर. पाटील यांची अनुपस्थिती संमेलनात जाणवली. त्यांच्यावरील मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून लवकरच ते बरे होतील, अशी माहिती देण्यात आली. अजित पवारांनीही आबांचा नामोल्लेख न करता कार्यकर्त्यांचे कान टोचले. 'तंबाखू-गुटख्याचे व्यसन सोडून द्या. याची जबरदस्त किंमत पक्षाने मोजली आहे. एकदा जन्माला आलाय. नीट वागा. एखाद्यावर कुटुंब अवलंबून असते. त्यांना निराधार करण्याचा अधिकार तुम्हाला नाही,’ असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.