पुणे - सोप्या मराठी भाषेतून विज्ञान लेखन करावे, या उद्देशाने मी लिहित गेलो. या लेखनाची साहित्य अकादमी संस्थेने दखल घेतली आणि इतका मोठा सन्मान दिल्याचा आनंद वाटतो, अशी भावना ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली.
नारळीकरांच्या ‘चार नगरांतील माझे विश्व’ या पुस्तकाला साहित्य अकादमी सन्मान जाहीर झाला. त्यानंतर दिवसभर त्यांच्या घरी, फोनवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. ते म्हणाले, सन्मान मिळणे हे अनपेक्षित आहे.
आजवर लेखनाचा जो उपद्व्याप केला, त्याला असा सन्मान मिळणे खूप आनंदाचे आहे.मी सोप्या मराठी भाषेत विज्ञान लेखन करण्याचा प्रयत्न केला. विज्ञानाची उकल सोप्या मातृभाषेत मांडण्यासाठी लेखन केले. असे सोपे लिहिणे मला साधले आणि आज या सन्मानाने ते साधल्याचा आनंद द्विगुणित केला. हे पुस्तक माझे आत्मचरित्रच आहे. वाचकांना आणि समीक्षकांनाही ते आवडले. हा एक नवा प्रयोगच होता, तो यशस्वी ठरल्याचे समाधान वाटते आहे. मुख्य म्हणजे माझे जगणे, अनुभव सोप्या पद्धतीने थेट वाचकांना भिडवता आले.
माझे बालपण वाराणसीत गेले. शिक्षणासाठी केंब्रिजला आल्यावर मी दर आठवड्याला घरी पत्र लिहित असे. ती पत्रे आई-वडिलांनी जपून ठेवली होती. ती मला मिळाल्याने हे लेखन करताना पूर्वस्मृती जाग्या झाल्या. मुंबईतला टाटा इन्स्टिट्यूटमधला कालखंड आधुनिक असल्याने स्मरणात होता. त्या तुलनेत पुण्यातले जीवन अलीकडचे आहे.
नवे लेखन सुरू
सध्या ‘युगायुगाची जुगलबंदी – गणिताची आणि विज्ञानाची’ या पुस्तकाचे काम सुरू आहे. गणित आणि विज्ञान यांचा पुरातन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचा परस्पर संबंध या पुस्तकात सोप्या भाषेत मांडणार आहे, असे डॉ. नारळीकर यांनी सांगितले.
या पुस्तकात ‘बाबा’ भेटतात
डॉ. नारळीकर सरांच्या तीन कन्या – गीता, गिरिजा आणि लीलावती – तिघी आज योगायोगाने घरीच होत्या. त्यामुळे नारळीकरांना पुरस्कार मिळाल्याची बातमी त्यांनी खूप एन्जॉय केली. या पुस्तकात ‘बाबा’ दिसतात. साहित्य अकादमीसारख्या सर्वोच्च संस्थेने त्यांच्या लेखनाची साहित्य म्हणून घेतलेली दखल आणि दिलेली दाद आनंददायी आहे.