आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Plot Home Farm Releted All Work Online In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतजमीन, घराच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार घरबसल्या करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जमिनीचे, शेताचे किंवा घराचे खरेदी-विक्री व्यवहार आता जगातील कुठल्याही कोपर्‍यात बसून करता यावेत, या दृष्टीने दुय्यम निबंधक कार्यालय, दस्तनोंदणी, भूमी अभिलेख, तलाठी आदी महसूल यंत्रणेतील कार्यालये ऑनलाइन जोडण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जमीन, शेत आणि घरांसंबधीचे सर्व व्यवहार ऑनलाइन पूर्ण करून संबंधित उतारे-दाखल्यांच्या प्रती घरबसल्या मिळाव्यात यासाठी राज्याच्या नोंदणी कायद्यातही दुरुस्ती केली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात एक एप्रिलपासून राज्यातल्या सर्व तलाठी कार्यालयांमधील व्यवहार ऑनलाइन केले जाणार आहेत. सात-बारावरच्या नोंदी, फेरफारही ऑनलाइन केल्या जातील, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. ‘भ्रष्टाचार, कामाला विलंब आणि हेलपाटे मारावे लागल्याने नागरिकांमध्ये महसूल विभागाबद्दल नाराजी असते. याला उत्तर म्हणून महसूल विभागाचे संपूर्ण कामकाज येत्या तीन वर्षांत ऑनलाइन करण्याची प्रक्रिया महसूल विभागाने हाती घेतली आहे,’ असे खडसे म्हणाले.

खरेदी-विक्री, भाडेकरार आदी व्यवहारांची नोंद दुय्यम निबंधकाकडे होत असतानाच ती मामलेदाराकडेही ऑनलाइन केली जाईल. पंधरा दिवसांत कुणाची हरकत न आल्यास संबंधिताच्या मोबाइलवर व्यवहार पूर्ण झाल्याचा संदेश पाठवला जाईल. त्यानंतर तो घरबसल्या वेबसाइटवरून प्रिंट काढून घेऊ शकेल.

सध्या राज्यातल्या बारा तालुक्यांमध्ये ऑनलाइन फेरफाराचे कामकाज यशस्वीपणे सुरू झाले आहे. एक एप्रिलपासून राज्यभर याची अंमलबजावणी होईल, असे खडसे यांनी सांगितले. नजिकच्या काळात या व्यवहारासाठीसुद्धा निबंधकाकडे जाण्याची गरज पडणार नाही. ऑनलाइन पेमेंट करून घरबसल्या खरेदी-विक्री करता येईल, असे खडसे यांनी स्पष्ट केले.

तलाठ्यांना लॅपटॉप, स्वाक्षर्‍याही डिजिटल
जमिनीचे उतारे, भूमापनाच्या नोंदी, मालकी हक्काचे दाखले आदी कामांसाठी शेतकर्‍यांना तलाठ्याकडे जाण्याची गरजच पडू नये, हा शासनाचा प्रयत्न आहे. सर्व कागदपत्रे ऑनलाइन करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. ई-फेरफार, ई-चावडीच्या माध्यमातून तीन वर्षांत महसूल यंत्रणा ऑनलाइन केली जाईल, असे खडसे यांनी सांगितले. ‘साडेबारा हजार तलाठ्यांना लॅपटॉप दिलेले आहेत. त्यांच्या स्वाक्षर्‍याही डिजिटल करण्यात आल्या आहेत,’ असे राज्याचे जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.

डिजिटल महाराष्ट्र
तलाठ्याच्या दप्तरात ३५ प्रकारच्या नोंदी केल्या जातात. तलाठ्याचे हे दप्तर ऑनलाइन आणण्याचे काम ४४,७०० गावांमध्ये दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे हस्तलिखित नोंदी बंद झाल्या आहेत. तलाठ्याचे दप्तर ऑनलाइन झाल्याने डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होईल.’ – चंद्रकांत दळवी, जमाबंदी आयुक्त.

सातबारा, स्टॅम्पसक्ती बंद
‘अनेक कारणांसाठी १०० रुपयांच्या बॉन्डवर प्रतिज्ञापत्र मागितले जाते. ही सक्ती बंद करून साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरावे, अशी सुधारणा केली जाणार आहे. सरकारी कार्यालयात सातबारा उतारा मागितला जातो. सातबाराची ही सक्तीही काढून टाकावी लागेल. आवश्यक तेव्हा शासकीय यंत्रणांनी तो ऑनलाइन पाहावा, अशी दुरुस्ती केली जाईल’, असे खडसे म्हणाले.