आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सर्वात मोठे दलाल, फ्रान्समधील विमान खरेदी करारात भ्रष्टाचार- महाजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच स्वत: सर्वात मोठे दलाल आहेत. फ्रान्सकडून करण्यात येणारी विमान खरेदी तत्कालीन यूपीए सरकारने थांबविली होती. पंतप्रधान मोदींनी मात्र फ्रान्स दौ-यामध्ये अंबानी आणि अदानी या उद्योगपतींना बरोबर घेऊन विमान खरेदीचा करार केला. 16 विमानांऐवजी 36 विमाने खरेदी करण्याचा 32 हजार कोटींचा हा करार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नकारात्मक शेरा मारलेला असतानाही मोदींनी निव्वळ दलालीसाठीच करार पूर्ण केला. हा मोठा भ्रष्टाचारच असून भविष्यात तो उजेडात आल्याशिवाय राहणार नाही, असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी आज केला.
पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर 'अच्छे दिन'ची पहिली पुण्यतिथी साजरी केली. मोदी सरकारने देशवासियांना वर्षभर 'लॉलीपॉप' दिल्याचे उपहासात्मकपणे सांगत प्रतिकात्मक 'लॉलीपॉप' दाखवून निदर्शने करण्यात आली. यावेळी 'लॉलीपॉप'चे वाटप करण्यात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्‍ते रत्‍नाकर महाजन, नगरसेवक कैलास कदम, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा ज्योती भारती उपस्थित होते. काँग्रेस पदाधिका-यांनी भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले.
महाजन म्हणाले, मोदी सरकार आता छाती बडवून सांगत आहे आमच्या सरकारविरोधात मागील एक वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. मग संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नकार कळवूनही फ्रान्समधील रॉफेल विमाने खरेदी करण्याचा घाट मोदींनी का घातला? यूपीए सरकारने जी विमाने खरेदी करण्याचे टाळले तीच यांनी दलालीसाठी केली. 16 विमाने खरेदी करण्याची गरज असताना मोदींनी 36 विमाने खरेदी करण्याबाबत करार केला. यामागे जास्तीत जास्त दलाली मिळवणे एवढाच उद्देश दिसतो असेही महाजन यांनी आरोप केला.
शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले, नरेंद्र मोदींचा जगातील सर्वात खोटारडे पंतप्रधान म्हणून गौरव करायला हवा. कारण युपीए सरकारनेच केलेल्या विकासयोजना स्वत:च्या नावावर ते आता खपवित आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नावे युपीए सरकारने राबविलेले स्वच्छता अभियान मोदी सरकार स्वच्छ भारत अभियान नावाने राबवित असून ही फसवेगिरी सामान्य नागरिकांच्या लक्षात आली आहेच. विविध योजनाही कशा ढापल्या ते जनतेला आगामी काळात पटवून सांगू, असेही साठेंनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...