आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएमपीएमएल स्कूलबसच्या भाडेदरात अडीच पट वाढ, पालिकेतील सत्ताधारी भाजप हतबल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असलेल्या बसच्या भाडेदरात परस्पर तब्बल अडीचपट वाढ केल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची पंचाईत झाली. विशेष म्हणजे जाब विचारणार्‍या महापौरांनाही कनिष्ठ अधिकार्‍यामार्फत जुजबी माहिती देण्यात आली. यामुळे महापालिकेत भाजप नव्हे, तर प्रशासनाचीच सत्ता असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
 
पुणेकरांनी भरघोस मतांनी निवडून दिलेले भाजपचे तब्बल ९८ नगरसेवक हतबल झाल्याचे चित्र सध्या मनपात पाहायला मिळत आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल २,२६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याचा प्रस्ताव अगदी घाईगडबडीत मंजूर करणार्‍या महापालिकेतील भाजपला आज पीएमीएमएलच्या अध्यक्षांनी चांगलाच दणका दिला.
 
शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी गुरूवारी सर्वसाधारण सभेमध्ये पीएमपीएमएलने स्कूलबसचे भाडे वाढविल्याने उपनगरात राहाणारे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सोसावा लागल्याचे निदर्शनास आणून दिले. पीएमपीएमएलने ६१ रुपये प्रति कि.मी.वरून थेट १४१ रुपये प्रति कि.मी. अशी भाडेवाढ केली आहे. पीएमपीएमएलच्या संचालक मंडळात भाडेवाढी संदर्भात कुठलाही निर्णय अथवा प्राथमिक चर्चा न करता प्रशासन भाडेवाढ कशी करु शकते. 

पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून पुर्वीच्याच भाडेदराने शाळांना तातडीने बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी संजय भोसले आणि विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली. महापौर मुक्ता टिळक यांनीही प्रशासनाने यासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेणे अपेक्षित होते, असे मत व्यक्त करत भाडेवाढीबाबत नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी पीएमपीएमएलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना तातडीने बोलावून घेउन निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन सभागृहात दिले.
 
सभा संपल्यानंतर काही वेळातच मुक्ता टिळक यांनी पीएमपीएमएलच्या अधिकार्‍यांना बोलावून घेतले. यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे हे स्वत: उपस्थित न राहाता, त्यांनी वाहतूक व्यवस्थापनातील एका अधिकार्‍याला पाठवून दिले. पीएमपीएमएलच्यावतीने ज्या शाळांना भाडेतत्वावर स्कूलबसेस दिल्या जातात त्यांना दोन दिवसांपुर्वी पत्र पाठवून भाडेवाढी संदर्भात कळविण्यात आले होते. परंतू या शाळांनी तब्बल अडीच पट वाढलेले भाडे देण्यास नकार दिल्याने बसेस पाठविण्यात आल्या नाहीत. भाडेवाढीचा निर्णय का घेण्यात आला, याचे स्पष्टीकरण देण्यास या अधिकार्‍याने असमर्थता दर्शविली. 

महापौर मुक्ता टिळक आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, की संचालक बैठकीशिवाय भाडेवाढीचा निर्णय घेतला गेला ही चूकच आहे. पीएमपीएमएल अध्यक्षांना भाडेवाढीचे कारण विचारण्यात आले असून पुर्वीच्याच दराने बसेसच उपलब्ध करून द्याव्यात असे पत्रही दिले आहे. भाडेवाढीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी माझे प्रयत्न राहातील. पीएमपीएमएल प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यात येईल, असे सांगितले. परंतू संध्याकाळी उशिरापर्यंत पीएमपीएमएल प्रशासनाकडून कुठलेही उत्तर न आल्याने किमान पहिल्या आठवड्यात तरी उपनगरातील विद्यार्थी आणि पालकांची ससेहोलपट होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
     
महापालिका आयुक्तांपाठोपाठ शासनाकडून आलेले पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे हे देखिल शासनाच्यावतीने सत्ता राबवित आहेत. राज्य शासनाने यापुर्वीच महापालिकेचे अनेक अधिकार स्वत:कडे घेतले असून भाजपचे १०० नगरसेवक केवळ बाहुले बनून राहील्याने शहरातील समस्या अधिकच जटील होत चालल्या असल्याची टिका विरोधकांकडून सुरू झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...