आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमाचा प्रवास व्यष्टीकडून समष्टीकडे; डॉ. अरुणा ढेरेंनी घेतला पुस्तकातून मागोवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रेमाचा विचार एका निराळ्या पण सकारात्मक दिशेने करून व्यक्तीपलीकडे समूहप्रेमाचा विचार रुजवणारा एक अनोखा प्रेमप्रवास लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी आपल्या संवेदनशील लेखणीने या लोकविलक्षण प्रेमाचा मागोवा घेतला आहे.

प्रेमप्रवास शब्दांकित करण्याच्या अनुभवाविषयी डॉ. ढेरे म्हणाल्या, प्रेम आणि मैत्री या दोन्ही संज्ञांकडे आपण मोकळेपणाने पाहत नाही. बहुतेक वेळा आपली दृष्टी पूर्वग्रहदूषितच असते. हे एक नाते व्यक्तीला नवे बळ, नवी ऊर्जा पुरवणारे असते. इतकेच नव्हे, तर ही भावना माणसाला व्यक्तिकेंद्रिततेकडून विशाल अशा समूहमानसाकडे घेऊन जाण्यास प्रेरक ठरते. आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवण्याचे सार्मथ्य या भावनांत असते. मात्र, या सुंदर संकल्पनेत स्त्री-पुरुष असा संदर्भ आला की आपली नजर दूषित बनते. म्हणूनच प्रेमाच्या भावनेकडे आपल्या बुजुर्गांनी कुठल्या दृष्टीने पाहिले, त्यांच्यामध्ये प्रेमामुळे कुठले बदल घडले, त्यांचा व्यक्ती म्हणून कसा विकास होत गेला आणि ही अत्यंत वैयक्तिक भावना समूहमानसात कशी परिणत होत गेली, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून मी केला आहे. प्रामुख्याने ज्यांचे जगणे राजकीय-सामाजिक क्षेत्राशी अधिक निगडित राहिले, अशा पंधरा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा विचार मी या पुस्तकात केला आहे. त्यात गुरुदेव टागोरांसह सेनापती बापट, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, सरोजिनी नायडू आदींचा समावेश आहे.

व्यक्तिगत आनंदाला नकार देत स्वत:पलीकडे जाऊन समाजाचा, देशकल्याणाचा विचार ज्यांनी केला, किंबहुना प्रेमभावनेनेच त्यांना असा विचार करण्याचे बळ दिले, तो प्रवास वाचकांनाही समृद्ध करणारा ठरेल, असे मला वाटते, असे त्या म्हणाल्या.

15 थोर व्यक्तींचा समावेश
‘प्रेमाकडून प्रेमाकडे’ या पुस्तकात नामदार गोपाळ कृष्ण गोखले, भगिनी निवेदिता, सरोजिनी नायडू, सेनापती बापट, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, गुरुदेव टागोर आदी पंधरा व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. छोट्या व्यक्तिगत प्रेमाकडून मानवजातीच्या विशाल प्रेमाकडे घेऊन जाणारा विचार या मंडळींनी आचरला आणि तोच या पुस्तकाच्या केंद्रस्थानी असेल, असे लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांनी सांगितले.