आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: मुलीने रोखला स्वत:चाच बालविवाह, पोलिसात माता-पित्याविरोधात तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यात अकरावीत शिक्षण घेत असलेल्या एका १६ वर्षांच्या मुलीने स्वत:चा बालविवाह रोखल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या आईवडिलांनीच हा विवाह लावण्याचे ठरवले होते. मात्र, मुलीने विवाहाला विरोध करत थेट पुणे पोलिस आयुक्तालय गाठत पालकांविरोधात तक्रार दिली.

रेश्मा कदम (नाव बदलले आहे) ही मुलगी कुटुंबीयांसह पुण्यात राहते. वडील रिक्षाचालक तर आई गृहिणी आहे. दहावीला चांगले गुण मिळाल्याने गुणवत्तेच्या जोरावर तिला सिम्बायोसिससारख्या शिक्षण संस्थेत अकरावीला प्रवेश मिळाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यात वडील मद्यपी असल्याने तिला रोज मारहाण करायचे. त्यामुळे मुलगी या त्रासाला कंटाळली होती. त्यातच कमी वयात लग्न झालेल्या आर्इने मुलीचाही विवाह कमी वयात करण्याचा अट्टहास धरत तिचे २५ वर्षांच्या देवऋषी नामक तरुणाशी लग्न जुळवले. लिपिक असलेल्या देवऋषीनेही लग्न धूमधडाक्यात करण्यासाठी वाघोली येथे एक लाख भरून मंगल कार्यालय बुक केले. रेश्माच्या आईनेही मुलीस दमदाटी करत मुलाशी फोनवर बोलण्यास भाग पाडले. त्यांच्यात जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वयात लग्न करण्याचा कुटुंबीयांचा निर्णय मान्य नसल्याने तिने पोलिसांकडे धाव घेऊन मदत मागितली.
दरम्यान, पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी सांगितले की, मुलीच्या आई-वडिलांना व नियोजित वराला समजावण्यात आले आहे. जबरदस्तीने बालविवाह लावण्याचा प्रकार घडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सर्वांना गजाआड करण्यात येईल. संबंधित मुलीस कुटुंबीयांनी कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्यास तिला पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.'
आजी-आजोबांनी केला सांभाळ
रेश्मा लग्नाला नकार देते म्हणून पालक तिला देवऋषीकडे नेऊन तिची समजूत काढत होते. मुलीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला काही वेळा घराबाहेर नेऊन मारहाण करायचे. ठरवलेल्या तरुणाशी लग्न केले नाही तर तुला मारून टाकू, अशी धमकीही पालकांनी तिला दिली. मी दीड महिन्याची असल्यापासून माझे चुलत आजी-आजोबा माझा सांभाळ करत असून आई-वडिलांनी मला जन्म देण्यापलीकडे काही केले नाही, असा मुलीचा आरोप आहे.