आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधिका-याचा पुण्यातील कॉलेज तरूणीवर बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लग्नाचे आमिष दाखवून एका पोलिस उपनिरीक्षकाने 20 वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष सोनवणे (30 रा. हडपसर, पुणे) असे अत्याचार करणा-या पोलिस अधिका-याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात सोनवणेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सोनवणेला अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, संतोष सोनवणे हा सध्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. तर त्याची पत्नी पुण्यात नोकरी करते. सुट्टीच्या काळात सोनवणे पत्नीला भेटण्यासाठी पुण्यात अधूनमधून यायचा. याचदरम्यान, सोनवणेची त्याच्या सास-याच्या मित्राशी ओळख झाली. त्यांना एक 20 वर्षाची मुलगी आहे. मुलीला चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळवून देतो म्हणून त्याने तिच्याशी ओळख वाढविली. पुढे संतोष सोनवणेने तिच्याशी जवळिक साधत लग्नाचे आमिष दाखवले व अत्याचार करण्यास सुरुवात केली.
मागील पंधरवड्यात त्याने संबंधित मुलीला मुंबईत बोलवून घेतले. तसेच भाड्याच्या फ्लॅटमध्ये बंद करून ठेवले. इकडे, तरूणीच्या पालकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. पोलिसांनी तिचा मोबाईल मुंब्रा येथे असल्याचे सांगितले तसेच तेथे कोणी तुमचे नातेवाईक आहे का अशी विचारणा केली. त्यानंतर तरूणीच्या पालकांनी संतोष सोनवणेचे नाव सांगितले. पोलिसांनी त्याचा मोबाईल सर्व्हिलान्सवर टाकला असता त्याचे लोकेशन व तरूणीच्या मोबाईलचे लोकेशन एकाच ठिकाणी असल्याचे सांगितले. त्यानंतर कळवा पोलिसांच्या मदतीने वानवडी पोलिसांनी संतोष सोनावणेला बेड्या ठोकल्या.