आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Raided On Youths Hukka Party In Pune, 31 Persons Arrested

तरुण-तरुणींच्या बेकायदा हुक्का पार्टीवर पुण्‍यात छापा, 31 जणांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - उच्चभ्रू वर्गातील आणि आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणींच्या बेकायदा हुक्का पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी झिंगलेल्या अवस्थेतील 31 जणांना अटक केली. शनिवारी रात्री उशिरा दीडच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील हॉटेल लुक लुक येथे ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेले सर्व तरुण-तरुणी मगरपट्टा, हिंजवडी, बाणेर, पिंपळे सौदागर, कोंढवा येथील आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत, तर त्यापैकी काही जण विद्यार्थी आहेत.
पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली सांगवी पोलिसांनी आपल्या पथकासह ही कारवाई केली. रात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सर्व जण मद्यधुंद झिंगलेल्या अवस्थेत होते. सर्वजण हायप्रोफाइल आयटी प्रोफेशनल्स आहेत. हॉटेल लुक लुकच्या व्यवस्थापक, कॅशियर, वेटर्स यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. नऊ हायप्रोफाइल तरुणी, 15 तरुण यांच्यासह हॉटेल मालक-व्यवस्थापक, कॅशियर आणि वेटर्स यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. हॉटेल मालक-व्यवस्थापक शब्बीर जमुदुद्दीन (वय 31), दिलीप जायभाये (29), कॅशियर किरण राजपूत (23) आणि वेटर्स संतोष देशमुख (22), कोनीरुल्ला हापीजुर मुल्ला (19), नीलम विश्वास (21), राकेश हालदार (31) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास हॉटेल टीम लुक लुक येथे बेकायदा हुक्का व मद्याची पार्टी सुरू असल्याची खबर मिळाली. त्याची खात्री केल्यावर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. त्या वेळी सुमारे 25 तरुण-तरुणींचा तिथे नशेत धिंगाणा सुरू होता. या वेळी पोलिसांना नशेत झिंगलेल्या 22 तरुण व नऊ तरुणी आढळल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यावर आम्ही इथे जेवणासाठी थांबलो होतो, असा कांगावा या तरुणाईने केला.
सकाळी सर्वांची रवानगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात करून सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत सर्वांनी नशा केल्याचे आढळून आल्यावर त्यांना अटक करण्यात आली.
31 जणांना हुक्का पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी झिंगलेल्या अवस्थेत अटक केली.
09 तरुणींचा समावेश
15 हायप्रोफाइल तरुणही
500 रुपयांच्या प्रत्येकी जातमुचलक्यावर सर्वांची तात्पुरती सुटका करण्यात आली.
हॉटेल मालक-व्यवस्थापक, कॅशियर आणि वेटर्स यांनाही अटक
आज तात्पुरता जामीन, उद्या पुन्हा कोर्टात हजेरी
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्वांना रविवारी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. प्रत्येकी 500 रुपयांच्या जातमुचलक्यावर या सर्वांची तात्पुरती सुटका करण्यात आली. सोमवारी या सर्वांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. आता सोमवारी न्यायालय या सर्वांच्या बाबतीत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.