आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशमुखी बाणा गळाला, शरद पवारांचे गुणगान गात सहकारमंत्र्यांचे साफ लोटांगण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘पवारसाहेब, पेपरातल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. मी सहकारमंत्री झाल्यावर सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्याकडे ‘बघून घेतो’ असे पत्रकारांनी छापले. परंतु पवारांना बघुन घेण्याची काय हिंमत आहे कोणाकडे?’ अशी जाहीर कबुली सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात दिली. ‘अरुण जेटलीच काय, जिथे दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी बारामतीत येऊन पवारांचे मार्गदर्शन घेतात. तिथे आमच्यासारख्यांचे काय?’ अशा शब्दात त्यांनी जणू साफ लाेटांगणच घातले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी वर्षारंभानिमित्त अायाेजित साेहळ्यात देशमुख बाेलत हाेते. ‘दोघात भांडणे लावण्याचे काम पत्रकारांचे आहे. कोणी काडी टाकतो. कोणी रॉकेलचा डबा घेऊन बसतो,’ असे सांगत देशमुखांनी माध्यमांवर खापर फाेडले. त्यानंतर त्यांनी शरद पवार अजित पवार यांची ताेंडभरून स्तुतीही केली. व्यासपीठावर बसलेले पवार काका-पुतणे मात्र मंत्री देशमुखांच्या या भाषणाचा मनसोक्त अानंद घेत हाेते.

सहकार क्षेत्रातल्या घोटाळ्यावरून अजित पवार यांची चौकशी चालू असल्याचाही देशमुख यांना विसर पडला. अजित पवारांच्याच मार्गदर्शनाखाली काम चालू असल्याचे त्यांनी सांगून टाकले. ‘पुणे जिल्हा बँकेच्या कामकाजाची स्तुती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीसुद्धा केली आहे. त्यामुळे या बँकेची कामे आता झटाझट झाली पाहिजेत. अभ्यास करून सांगतो, असली उत्तरे देऊ नका. खूप झाला अभ्यास,’ असे अजित पवार यांनी देशमुख यांना सुनावले. त्याला देशमुखांनीही होकार भरला.

अजित पवारांच्या भाषणानंतर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट बोलण्यास उभे राहिले. ते म्हणाले, ‘दादांच्या फटाक्यांची माळ उडाल्यानंतर आमच्या टिकल्या कशाला उडवायच्या? पण मला त्यांच्या फटाक्यांचा त्रास होत नाही. त्यांनाही माझ्या टिकल्यांचा त्रास होत नाही. आमची दिवाळी व्यवस्थित चालू आहे.’ ‘राजकारणात मात्र अजित पवारांना मी शुभेच्छा देऊ शकत नाही. नाही तर ते माझ्या कधीही अंगलट येऊ शकेल,’ असे स्पष्ट करण्यास मात्र बापट विसरले नाहीत.

सोलापूरचे असेही ‘कौतुक’ !
‘मीसोलापूरचा बारका शेतकरी. तीन गावांचा शेतकरी असूनही मला तिन्ही गावांतल्या सोसायट्यांनी वारंवार विनंती करूनही सभासद करून घेतले नाही. पुणे जिल्हा चांगला दिसतो. तुमच्याकडे संगनमताने वागतात. सोलापुरात सुडाचे राजकारण चालते. विरोधकाचा काटा कसा काढायचा हे आमच्या जिल्ह्यात येऊन बघा,’ असे मंत्री सुभाष देशमुख म्हणाले. जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांना मजबूत लाभांश आणि नजरेत भरणारी सोन्याची वस्तू लागते. तुम्ही अशा भेटवस्तू मागता की नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. समोरून काहीच उत्तर आले नाही. त्यावर ‘हे फक्त आमच्याकडेच दिसतंय. बहुधा आम्ही गरीब असल्यामुळे असेल,’ अशी टिप्पणी देशमुखांनी केली.
बातम्या आणखी आहेत...