आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 'Political' Paryusana Promised Regardless Of The State Of Shock Poultry Industry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'खाद्य'वाद : रोज २ कोटींचे नुकसान, भाईंदरपाठोपाठ मुंबईतही राजकारण पेटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मीरा-भाईंदर पाठोपाठ मुंबई महापालिकेतही मांसविक्रीवर बंदी लागू होण्याच्या शक्यतेने पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सध्याच्या दरानुसार यामुळे रोजचे दोन कोटी रुपयांचे नुकसान तर होईलच पण शिल्लक कोंबड्यांमुळे स्थिती आणखी बिकट होण्याची भीती पोल्ट्री तज्ज्ञांना आहे.
जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वानिमित्त आठ दिवस मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महापालिकेने घेतला. मुंबईतही मांसविक्री बंदीचा कालावधी वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जैन धर्मियांना खूष करण्यासाठी मांसविक्री बंदीचा निर्णय पुढे रेटण्याच्या प्रयत्न होत आहे. या राजकीय खेळीमधे दुष्काळी भागातल्या पोल्ट्री उत्पादकांचा बळी जाणार आहे.

मुंबईतील कोंबड्यांचा रोजचा खप साडेतीन लाखांपर्यंत घसरला आहे. मुंबईतली मांसविक्री बंद राहिल्याचा परिणाम इतर बाजारपेठांवर होतो. महाराष्ट्र पोल्ट्री ब्रिडर्स वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण गांगुर्डे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, की श्रावण आणि कुंभमेळ्यामुळे आधीच पोल्ट्रीमध्ये दहा दिवसांचा ‘बॅकलॉग’ आहे. एरव्ही कोंबडी ४१-४२ दिवसांची झाली की विकली जाते. सध्या खप नसल्याने आधीच याला उशीर होत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली. पर्युषण पर्वाची बंदी आली तर ही स्थिती आणखी गंभीर होईल.

खडकेश्वरा हॅचरिजचे अध्यक्ष राघवेंद्र जोशी यांनी सांगितले, “राज्यातल्या दुष्काळी स्थितीमुळे कोंबड्यांचा खप तीस टक्क्यांनी घटला आहे. एक किलो कोंबडीचा उत्पादन खर्च ६५ रुपये असताना ४० रुपये किलो दराने सध्या विक्री सुरु आहे. श्रावणाच्या अखेरीला या मंदीतून बाहेर पडण्याची आशा पोल्ट्री उद्योगाला आहे. मात्र त्याआधीच पर्युषण पर्वाचे नवे संकट उभे केले जात आहे.” वेंकटेश्वरा हॅचरीजचे उपमहाव्यवस्थापक डॉ. पी. जी. पेडगावकर म्हणाले, की मांसविक्री बंदीचा निर्णय अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. पुर्णतः कायदेशीर असलेल्या उद्योगाला एक दिवसही बंदी घालता कामा नये. यामुळे एका कोबंडीमागे तीस रुपयांचा तोटा सहन करणारा दुष्काळातला पोल्ट्री उत्पादक आणखी अडचणीत येईल.

कोणासाठी निर्णय?
नुकत्याच जाहीर झालेल्या जनगणना अहवालानुसार संपूर्ण देशातील जैन धर्मियांची संख्या ४५ लाख म्हणजेच देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ०.४ टक्के आहे. महाराष्ट्रातील जैन धर्मियांची संख्या १४ लाख ३९ हजार आहे. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी १.२४ टक्के जैन आहेत. यापुर्वी पर्युषण पर्वासाठी मांसविक्रीवर बंदी घातली गेलेली नाही. जैन धर्मियांची लक्षणीय संख्या असलेल्या गुजरात, राजस्थान या राज्यातही असा निर्णय झालेला नाही. गुजरातेत कत्तलखाने बंद असतात मात्र मांसविक्रीवर बंदी नसते.

कोंबडी खपातही मुंबई राजधानी
कोंबड्यांच्या दैनंदिन खपाच्या बाबतीत मुंबई देशाची राजधानी आहे. राज्यातल्या कोंबडी उत्पादनापैकी ४० टक्के खप रोज मुंबईतच होतो. मुंबईतील मांसविक्री आठ दिवस थांबली तर इतर बाजारपेठांमध्येही मंदी येते.

आकडे बोलतात
महाराष्ट्रातील पोल्ट्री फार्मस १३ लाख.
दरमहा कोंबडी उत्पादन ०३ कोटी
रोजचे कोंबडी उत्पादन १० लाख
रोजगार निर्मिती १५ लाख