आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालनियुक्तीत राजकीय खोगीरभरती; साहित्यिकांना पाहिजे आमदारकी..दिले UP चे उदाहरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त बारा जागांवर साहित्य, कला आणि विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची सूचना राज्यघटनेत करण्यात आलेली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या निर्मितीपासून या सूचनेप्रमाणे नियुक्त्या न झाल्याने मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. या संदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधले आहे.

‘राज्यघटनेने स्पष्ट निर्देश देऊनही साहित्य- कला- विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या विधान परिषदेवर नियुक्त्या वर्षानुवर्षे करण्यात आलेल्या नाहीत. या जागी विविध पक्षांच्या राजकीय व्यक्तींचीच नेमणूक त्या क्षेत्रातले तज्ज्ञ दाखवून केली जाते,’ अशी तक्रार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठविलेल्या या पत्रात केली आहे.  
 
महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने या विषयावर नागपूर न्यायालयात जनहित याचिका दाखल करून  या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. मात्र, ही याचिका मुंबई न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. ही याचिका लवकर निकालात काढण्याबाबत राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे ज्येष्ठ नागरिक असलेले याचिकाकर्ते व त्यांच्या वकिलांना केवळ नागपूर-मुंबई असे हेलपाटे मारावे लागतात, अशी खंतही डाॅ. जोशी यांनी पत्रात व्यक्त केली आहे.  
 
महानाेरांचे कार्य मात्र भरीव
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी महामंडळाच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. त्यांनी सांगितले की, निवडणुकांमध्ये पडलेले उमेदवार किंवा सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील उमेदवारांनाच विधान परिषदेवर पाठवले जाते. सांस्कृतिक क्षेत्राबद्दलची आस्था सत्ताधाऱ्यांकडून नेहमी व्यक्त होते, पण ती कृतीतून दिसत नाही. विचारवंत कृतिशील नसतात, असे एकीकडे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूने कृतिशीलता दाखवण्याची त्यांची संधी डावलायची, असा प्रकार सुरू अाहे,’ असे ते म्हणाले. मात्र ना. धों. महानोरांनी विधान परिषदेत शेतकऱ्यांसाठी भरीव काम करून दाखवले होते,’ अशी अाठवणही जाेशींनी सांगितली.

राज्यपाल राम नाईक यांचा आदर्श  
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी त्या राज्यातील साहित्य, कला, विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची नावे प्रस्तावात नसल्याने हा प्रस्तावच घटनाबाह्य ठरवला हाेता. तसेच तेथील मुख्यमंत्र्यांचा असा प्रस्तावही परत पाठवून दिला हाेता, याकडे डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री व राज्यपालांना पाठवलेल्या पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

डाेंबिवलीतील साहित्य संमेलनातही ठराव  
साहित्य, कला, विज्ञान क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्त्या विधान परिषदेवर व्हाव्यात, असा ठराव डोंबिवलीच्या  साहित्य संमेलनात मंजूर केला होता. हा ठरावदेखील मुख्यमंत्री व राज्यपालांकडे पाठवला होता. ‘शासनातर्फे साहित्य, कला, विज्ञान क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्त्या विधान परिषदेवर करून नियुक्त्यांचा आदेश भरला जाईल, असे राज्यपालांनी न्यायालयाला आश्वासित करून याचिका निकालात काढावी,’ अशी मागणीही ठरावात केली होती. 
बातम्या आणखी आहेत...