आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Politician Mathamathics Incorrected, Sushilkumar Shinde Confession

राजकारण्यांचेही गणित बिघडले, सुशीलकुमार शिंदे यांची कबुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘आजूबाजूला घडणा-या घटना लक्षात घ्यायचे चुकल्याने आम्हा राजकारणी मंडळींचेही गणित बिघडले आहे. समाजाचेही भान सुटल्यासारखे वाटते. खोलात जाऊन विचार करायला कोणाला वेळ नाही; पण लक्षात कोण घेतो,’ असा सवाल देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही पडला.


मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक ह. ना. आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो’ या गाजलेल्या कादंबरीच्या शीर्षकाची आठवण शिंदे यांना झाली. निमित्त होते वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या ‘मूक संवाद’ या पुस्तक प्रकाशनाचे. फुटाणे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले अध्यक्षस्थानी होते. दैनिक ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


‘एखादी घटना घडल्यावर त्यावर थोडी टीका करायची की चालले पुढे. परत दोन-तीन दिवसांनी नवी घटना. वैचारिक भूमिकांमधून देश घडला. परंतु गेल्या 30-40 वर्षांचा परामर्श घेतला की आपण आपल्या तत्त्वांपासून दूर चालल्याची जाणीव होते. समाज जोपर्यंत चिंतक होत नाही तोपर्यंत कितीही लेखन-वाचन झाले तरी त्याला अर्थ नाही. फुटाणे यांच्या पुस्तकातून आनंद मिळतो. चिंतन होते आणि समाजाचे जागरणही होते,’ असे शिंदे म्हणाले.


राजकारणी बिल्डरांमध्ये रमतात
पूर्वीच्या काळी होणारा साहित्यिक, कलावंत आणि राजकारणी यांच्यातील संवाद आता पूर्णपणे थांबला आहे. राजकीय लोकांचे अड्डे बदलले आहेत. यशवंतराव चव्हाणांना वेळ काढण्यासाठी ग. दि. माडगूळकर लागायचे. आताचे राजकारणी बिल्डरांमध्ये रमतात. राजकारण, समाजकारण आणि संस्कृती हे तीन जणू वेगवेगळे कप्पे वाटत आहेत. राजकारणी मंडळींचा सांस्कृतिकतेशी संबंध नाही. सांस्कृतिक मंडळी समाजापासून दुरावली आहेत. फुटाणे यांचा ‘मूक संवाद’ सांस्कृतिक व नैतिक -हास दाखवणारा आहे, असे केतकर यांनी सांगितले.


राजकारण्यांबद्दल तिरस्कार : फुटाणे
समकालीन वास्तवाला सामोरे जाणारे आणि राजकीय भान असणारे लेखक म्हणून फुटाणे यांचे स्थान मराठी साहित्यात खूप वरचे आहे,’ असे डॉ. कोत्तापल्ले म्हणाले. फुटाणे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आपल्या लिहिण्या-बोलण्याने फार काही होते असे नाही. परंतु राज्यकर्ते, त्यांचे कार्यकर्ते आणि प्रशासनाबद्दल लोकांच्या मनात तिरस्कार आहे. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी मी ‘मूक संवाद’ साधला. फ. मुं. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.