आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटांत सकारात्मक ऊर्जा : अहिरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - व्यावसायिकदृष्ट्या मराठी चित्रपट तोट्यात आहेत, तरीही मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या प्रचंड आहे. याचे कारण म्हणजे मराठी चित्रपटांत सकारात्मक ऊर्जा आहे, असे निरीक्षण प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व निर्माते गजेंद्र अहिरे यांनी येथे मांडले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अहिरे यांचा ‘अनुमती’ हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, निर्माते विनय गानू आणि प्रशांत गोखले या वेळी उपस्थित होते.

अहिरे म्हणाले, गेल्या दहा वर्षांत मराठी चित्रपटांच्या निर्मितीत लक्षणीय फरक पडला आहे. चित्रपटांची संख्या वाढली आहेच; पण ती गुणात्मक, आशयात्मक पातळीवरही आहे. आज पिफमध्ये स्पर्धात्मक विभागात तब्बल 14 मराठी चित्रपट आहेत, हेच बोलके आहे. मराठीतील काही नट जागतिक स्तरावरील अभिनेते बनू शकतात, मात्र त्यासाठी त्यांच्यासाठी खास व्यक्तिरेखा लिहिल्या गेल्या पाहिजेत. तसेच केवळ व्यावसायिक गणिते बांधून चित्रपट निर्माण करणा-ंनाच यशस्वी म्हणणे योग्य आहे का, असा सवालही त्यांनी विचारला. चित्रपट मनाला भिडणे महत्त्वाचे असते. मराठीतील मांडणी, आशय आणि वैविध्य - प्रयोगशीलता अन्य प्रादेशिक चित्रपटांत नाही, असेही ते म्हणाले.

प्रेक्षक टीव्हीत अडकले
ज्यांच्या आश्रयावर मराठी चित्रपट चालतो, ते प्रेक्षकच आज छोट्या पडद्याला चिकटून बसले आहेत, अशी टीका विक्रम गोखले यांनी केली. चित्रपट ही गांभीर्याने आस्वादण्याची कला आहे, हेच प्रेक्षक विसरलेत. चांगला चित्रपट आणि चालणारा चित्रपट यात फरक आहे, याचाच त्यांना विसर पडलाय. माहेरची साडी हा चालणारा चित्रपट असला तरी तो चांगला नाही, असेही गोखले म्हणाले.