पुणे- पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्रमुखपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी गेले साडेतीन महिने ‘एफटीआयआय’ विद्यार्थ्यांनी संप पुकारला आहे. मंगळवारी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांच्याशी विद्यार्थी प्रतिनिधींची सकारात्मक चर्चा झाली खरी पण त्यात कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. विद्यार्थ्यांचे सात जणांचे शिष्टमंडळ, माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधी अरुणा राजे यांच्यासोबत राठोड यांनी चर्चा केली.
संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्यांच्या नेमणुकीला असलेला विद्यार्थ्यांचा विरोध कायम आहे. संस्थेला ‘नॅशनल एक्सलन्स’चा दर्जा मिळावा, अत्याधुनिक तांत्रिक सुविधांची उपलब्धता असावी आदी मागण्याही त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. नजीकच्या भविष्यात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत विस्तृत चर्चा करू, तसेच मुकेश शर्मा समितीचा अहवाल मिळाल्यावर चर्चा करू, असे आश्वासन राठोड यांनी दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.