आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राजस्थानचा उत्तर भाग तसेच लगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मराठवाडा तसेच विदर्भाच्या काही भागांत दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. हीच परिस्थिती पुढील 48 तास कायम राहणार असल्याने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागातील सूत्रांनी सांगितले.
मागील दोन दिवसांत मराठवाड्यात परभणी, नांदेडच्या अनेक भागांत कुठे जोरदार, तर कुठे रिमझिम पाऊस पडला. काही ठिकाणी जोरदार गारपीटही झाली. राज्यात इतरत्र सांगली, कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, नागपूर, वर्धा येथेही पावसाने हजेरी लावली. राज्याचा बराच भाग दुष्काळाच्या तीव्र झळांनी होरपळत असताना या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी फळबागा आणि रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. आंब्यावरील मोहोरही मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार कमी दाबाचा पट्टा सध्या अरबी समुद्राच्या दक्षिण भागावर आहे. त्याच्या प्रभावामुळे येत्या दोन दिवसांतही कुठे तुरळक तर कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे असेल. गेल्या 24 तासांत यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया येथेही पावसाची नोंद झाली आहे. पावसाने सरासरी तापमानात किंचित घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान मालेगाव येथे 14.2 अंश इतके नोंदवले गेले. तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा आता चढू लागला आहे. त्यामुळे या गारव्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल.

कोल्हापूर, सांगली परिसरात पाऊस
कोल्हापूर आणि सांगली परिसरात शनिवारी सकाळी पाऊस पडला. कोल्हापूर येथे पहाटे अर्धा तास पाऊस पडला. यानंतर पुन्हा साडेआठनंतर पाऊण तास पाऊस झाला. सांगली आणि मिरज परिसरातही सकाळी पाऊस झाला. मात्र, दुष्काळी पट्ट्यात पाऊस झाला नाही.