आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान तासभर मिळाला तरच गाणार, डॉ. प्रभा अत्रे यांनी दिला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची सांगता यंदा सुरेल होण्याऐवजी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या नाराजीमुळे काहीशी बेसुरी झाली आणि रविवारी उत्तररात्री घरी परतणाऱ्या हजारो रसिकांच्या ओठावर हाच नाराजीनामा राहिला. गाण्यासाठी कमी वेळ मिळाल्याने नाराज झालेल्या प्रभा अत्रे यांनी ‘पुढच्या वर्षी एक तास मिळाला तरच गाईन,’ असा इशाराही अायाेजकांना देऊन टाकला.
सवाई गंधर्व संगीत महोत्सव यंदा १० ते १३ डिसेंबरदरम्यान झाला. शेवटच्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंतचे वेळेचे बंधन शिथिल करून रात्री १२ पर्यंतची परवानगी आर्य संगीत प्रसारक मंडळाला दरवर्षी मिळते. तशी ती यंदाही मिळाली होती. मात्र, अखेरच्या पाचव्या सत्रात कलाकारांची संख्या अधिक होती. दुपारी ३ वाजता सुरू झालेले हे सत्र रात्री १२ वाजता थांबणे अपेक्षित होतेच, पण कलाकारांची संख्या अधिक असल्याने वेळापत्रकावर परिणाम झाला आणि डॉ. प्रभा अत्रे यांना जेमतेम ४० मिनिटेच मिळाली. गाण्यात जरा कुठे रंग भरतोय, तोच ‘वेळ संपली’ असल्याचे आयोजकांनी सांगितल्याने प्रभाताई संतप्त झाल्या आणि ‘पुढच्या वर्षी किमान एक तास वेळ मिळाला तरच मी गाईन, अन्यथा नाही,’ अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
‘सवाई’ची सांगता पंडित भीमसेन जोशी हयात असेपर्यंत तेच करत असत. भीमसेन जोशींचे गाणे संपले की सवाई गंधर्वांचे ध्वनिमुद्रित गायन ऐकवून सवाईचा स्वरसोहळा संपत असे. भीमसेन जोशींच्या निधनानंतर किराणा घराण्याच्या सर्वात ज्येष्ठ गायिका म्हणून सांगताप्रसंगीच्या गायनाचा हा मान प्रभाताईंकडे आहे. मात्र, यंदाच्या महाेत्सवात रविवारी रात्री सांगतेच्या दिवशी अखेरच्या सत्रात
पद्मा देशपांडे, भारती वैशंपायन, उपेंद्र भट, शुभा मुद््गल, सुरेश वाडकर, मंजू मेहता आणि पार्थोसारथी असे सात कलाकार होते. त्यामुळे प्रभाताईंना स्वरमंच मिळाला तोच रात्री ११.२० नंतर. सत्कार, परिचय, वाद्य लावणे होऊन प्रत्यक्ष गायनाला सुरुवात झाली. पहिली रचना संपताच वेळ संपल्याची सूचना आल्याने त्या
नाराज झाल्या.

पुढच्या वेळी काळजी घेऊ
‘रात्री १२ वाजेच्या ठोक्याला पोलिस हस्तक्षेप करतात. वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळणे त्यामुळे अनिवार्य ठरते. अन्यथा रंगात आलेली मैफल थांबवणे आमच्याही जिवावर येते. पण नियमांच्या पालनाची अपरिहार्यता आड येते. पुढच्या वेळी प्रभाताईंना योग्य वेळ देण्याची काळजी घेऊ,’ असे आयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...