आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस राज्यांत भाजपचे सीएम करण्याचे लक्ष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला २३० दिवस पूर्ण झाले आहेत. जनतेच्या विकासाची कामे करत, २०१९ पर्यंत देशातील २० राज्यांत भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री करण्याचे आमचे लक्ष्य आहे. मात्र, विरोधक विकासकामांच्या विधेयकांना विरोध करून विकासात अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

जावडेकर म्हणाले, विरोधक हे देशाच्या प्रगतीची वाटमारी करत असून या धोरणाचा आम्ही निषेध करतो. सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याची आमची संकल्पना आहे. फेब्रुवारीतील अधिवेशनापर्यंत विरोधकांना सद््बुद्धी येईल व ते नीट काम करतील, अशी आशा आहे.

मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून महागाईवर नियंत्रण, भ्रष्टाचाराविरोधात कठोर उपाययोजना, शेतकऱ्यांच्या हितासाठी डब्ल्यूटीओत किमान हमी भाव व खाद्यसुरक्षा व्यवस्था, गतिमान सुशासन प्रक्रिया, मेक इन इंडिया, गंगा स्वच्छता अभियान, स्मार्ट सिटी योजना, पीएम-सीएम टीम, नीती आयोग स्थापना, स्वच्छ भारत अभियान, असे उपक्रम राबवले आहेत.

पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत तीन महिन्यांत आठ कोटी खाती उघडून जागतिक विक्रम केला आहे. या अंतर्गत प्रत्येक खातेधारकासाठी ३० हजार रुपयांचा आयुर्विमा, एक लाख रुपयांचा अपघाती विमा व पाच हजार कर्जाची सुविधा देण्यात आली आहे.
वनीकरणासाठी ३३ हजार कोटी
जावडेकर म्हणाले, पर्यावरण मंत्रालयात अनेक प्रकारच्या नियमांमुळे उद्योगांच्या विकासकामांच्या परवानग्या प्रलंबित होत्या. त्यामुळे हे खाते स्पीड ब्रेकर खाते म्हणून ओळखले जात होते. आता या खात्यात पारदर्शकता आली असून ऑनलाइन अर्ज तपासणी सुरू करण्यात आली आहे. प्रलंबित संरक्षण प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विकासाच्या ७४ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात वनीकरणासाठी प्रलंबित एक खटला असून त्यात पर्यावरण खाते आपली भूमिका मांडून प्रत्येक राज्यास वनीकरणासाठी ३३ हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहे.