आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prakash Javdekar News In Marathi, Information And Broadcasting Minister

मध्यम लहरींचे प्रक्षेपण एफएमवर - प्रकाश जावडेकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मोबाइलचा वापर प्रचंड वाढल्याने मध्यम लहरींवरील प्रसारण सुस्पष्टपणे ऐकू येत नाही. यासाठी आकाशवाणीचे मध्यम लहरींवरील सर्व प्रक्षेपण एफएमवर प्रसारित करण्याचे काम सुरू झाले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय माहिती, प्रसारण, संसदीय कामकाज व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दूरदर्शन आणि आकाशवाणी या दोन्ही सरकारी माध्यम वाहिन्यांचा दर्जा सुधारण्यावर आता भर देण्यात येत आहे. लवकरच या वाहिन्या प्रेक्षकाभिमुख होऊन दर्जेदार कार्यक्रम घेऊन श्रोते व प्रेक्षकांना भेटतील. त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. प्रसारभारतीची स्वायत्तता कायम ठेवूनच नवीन भरती तसेच नियुक्ती केली जाईल, असेही ते म्हणाले.

लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज सोमवारपासून सुरळीतपणे चालू होईल. रेल्वे अर्थसंकल्पावर सोमवारी तर केंद्रीय अर्थसंकल्पावार मंगळवार व बुधवारी चर्चा होईल, असे सांगून जावडेकर म्हणाले, गाझापट्टीतील हल्ल्यांच्या मुद्द्यावरील चर्चेनंतर दोन्ही अर्थसंकल्पांवर चर्चा केली जाईल.

महाराष्ट्रात परिवर्तन अटळ
येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन अटळ आहे. मात्र भविष्यात राज्याची धुरा कुणाकडे सोपवायची, याचा निर्णय निवडणुकीच्या निकालानंतर पक्ष घेईल.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आयुष्याच्या पूर्वार्धात बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये दहा वर्षे सेवा दिली होती. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून महाबँकेतर्फे जावडेकर यांचा विशेष सत्कार लोकमंगल या बँकेच्या मुख्यालयात करण्यात आला. यावेळी जावडेकर यांच्या हस्ते महासिक्युअर या नवीन सेवेचे उद्घाटनही करण्यात आले. या सेवेद्वारा तीन लाख इंटरनेट ग्राहकांच्या सुरक्षेची हमी बँक घेणार आहे. बँकेच्या सेवा अधिक विश्वासार्ह होण्यासाठी ही सेवा महत्त्वपूर्ण ठरेल, असे उद्गार जावडेकर यांनी यावेळी काढले.