आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सततच्या दुष्काळांची तयारी करावी लागेल - योगेंद्र यादव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - “सध्याचा देशातील दुष्काळ हा अपघात नाही. भविष्यात देखील याहून भयानक दुष्काळांचा सामना करण्यासाठी देशाला वारंवार तयार राहावे लागेल. त्यासाठी पाणी वापर आणि पाणी संवर्धनाची जलनीती आखावी लागेल,” असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.

३० सप्टेंबर रोजी मॉन्सून कालावधी संपल्यानंतर १ ऑक्टोबरच्या सकाळीच देशाला सलग दुसऱ्या दुष्काळाला सामोरे जावे लागणार असल्याची जाणीव झाली होती. देशातील २५४ जिल्ह्यांमध्ये अवर्षण असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, देशाचा भगवान असलेल्या क्रिकेटच्या ‘आयपीएल’ला पाणीटंचाईची झळ बसेपर्यंत या स्थितीकडे सरकार आणि प्रसारमाध्यमांचे लक्ष गेले नाही, अशी टीका यादव यांनी केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित ज. स. करंदीकर व्याख्यानात ते ‘देशातील दुष्काळ’ या विषयावर बोलत होते. संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर या वेळी उपस्थित होते. कार्यकारिणी सदस्य मंगेश फल्ले यांनी सूत्रसंचालन केले.

यादव म्हणाले, देशातील ग्रामीण भागाला गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. पाण्यासाठी दाहीदिशा धुंडाळणाऱ्या बायका-मुले हे चित्र ग्रामीण भारतात नेहमीचे झाले आहे. मात्र, शहरी भागालासुद्धा जेव्हा पाणीटंचाई जाणवायला लागली तेव्हाच प्रसारमाध्यमांचे आणि राजकारण्यांचे लक्ष दुष्काळाकडे गेले. तेलंगणा, मराठवाडा आणि बुंदेलखंड या प्रदेशात पाणीटंचाईची स्थिती सर्वात वाईट आहे. कर्नाटक ते हरियाणा अशी पंधरा दिवसांची संवेदना यात्रा काढून या स्थितीची माहिती मी ऑक्टोबरमध्येच सरकारला दिली होती.

दुष्काळाची वारंवारिता भविष्यात वाढणार आहे. या संकटाशी जुळवून घेण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले पाहिजे, असे यादव म्हणाले. त्यांनी सांगितले, की शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरून देणारी एकही योजना गेल्या ६५ वर्षांत देशात आलेली नाही. या दृष्टीने निर्णय व्हायला हवा. उसालाच नव्हे तर प्रत्येक पिकाला हमीभाव आणि नुकसान भरपाई द्यायला हवी.

जलयुक्त शिवारचे कौतुक : महाराष्ट्र सरकारची जलयुक्त शिवार योजना सैद्धांतिक पातळीवर चांगली आहे.योग्य दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे यातून दिसते. मात्र या योजनेचे परिणाम दिसण्यासाठी एक-दोन वर्षे थांबावे लागेल.प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी झाली की गावपातळीवर त्यात भ्रष्टाचार झाला हे पाहावे लागेल, असे यादव म्हणाले.

ही शोकांतिका
“बुंदेलखंडातील ४० टक्के लोकांच्या आहारातून गेल्या अनेक महिन्यांपासून डाळ गायब झाली आहे. साठ टक्के मुलांना दूध मिळत नाही. या स्थितीत याच बुंदेलखंडापासून शंभर किलोमीटरवर मुलायमसिंह यादव त्यांच्या वाढदिवसाचा जश्न साजरा करण्यात मश्गूल होते. दुष्काळाबरोबरच माणसांचे मन, बुद्धी आणि भावनासुद्धा कोरड्या व्हाव्यात ही शोकांतिका आहे.” योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते