आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्षम लोकशाहीसाठी प्रसारमाध्यमे महत्त्वाची : राष्ट्रपती मुखर्जी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यघटनेने सामान्य नागरिकांना दिलेल्या घटनात्मक अधिकारांचे, स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याच्या कामी माध्यमे महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी माध्यमांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

त्रिदल संस्थेच्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार उद्योजक प्रतापराव पवार यांना मुखर्जी यांच्या हस्ते शुक्रवारी पुण्यात देण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव अध्यक्षस्थानी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. ए. माशेलकर, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई या वेळी उपस्थित होते.

आईमुळेच आम्ही घडलाे : शरद पवार
शरद पवार म्हणाले, ‘आईच्या संस्कारांमुळेच आम्ही भावंडे घडलो. शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना आम्हाला मात्र तिने उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळेच आम्ही सर्व भावंडे वेगवेगळ्या क्षेत्रांत काही करू शकलो. कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी सामाजिक भान जपण्याची आईची शिकवण आम्ही कधीच विसरणार नाही’, असे त्यांनी सांगितले. सत्कारानंतर बोलताना प्रतापराव पवार म्हणाले की, ‘जात, धर्म, भाषा, प्रांत यामुळे आपण विभागलेलो राहिलो. इतिहासापासून शिकवण घेत आपण आदर्श घालून दिला पाहिजे.’

राष्ट्रपतींच्या हस्ते सुपूत्राला डाॅक्टरेट
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर व पश्चिम बंगालचे खासदार अभिजित मुखर्जी यांना डाॅ. डी. वाय.पाटील विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मानद ‘डाॅक्टरेट’ पदवीचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शुक्रवारी पुण्यात वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, अभिजित मुखर्जी हे राष्ट्रपतींचे सुपूत्र असून वडिलांच्या हस्ते मुलाला पदवी बहाल करण्याचा अनाेखा साेहळा पुणेकरांना पाहण्यास मिळाला.

‘भारतातील अनेक विद्यार्थी दरवर्षी विदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. या विद्यार्थ्यांना भारताताच शिक्षण घेणे व संशाेधन करण्यासाठी पायाभूत साेयीसुविधा मिळवून देणे गरजेचे आहे,’ असे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...