आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थात्मक वाढीवर नव्हे, गुणात्मकतेवर भर द्या - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - "जागतिक दर्जाच्या पहिल्या दाेनशे विद्यापीठांमध्ये एकाही भारतीय विद्यापीठाचा समावेश नाही. भारतीय विद्यापीठात शिकणार्‍या एकालाही नोबेल मिळत नाही. ही स्थिती बदलण्यासाठी भारतीय विद्यापीठांनी केवळ संस्थात्मक वाढीवर भर न देता गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष द्यावे,’ अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी व्यक्त केली.

भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव अध्यक्षस्थानी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी कुलपती कदम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गाैरव करण्यात आला.

मुखर्जी म्हणाले, "भारतात गुणवत्तेची कमी नाही. ब्रिटिश काळात कोलकाता, चेन्नई, पंजाब या विद्यापीठांमधे शिकलेल्या सी. व्ही. रामन, हरगोविंद खुराणा, अमर्त्य सेन यासारख्या विद्वानांनी परदेशात जाऊन नोबेल मिळवले. गुणवत्ता आणि दर्जेदार प्राध्यापकांची देशात वानवा नाही. गरज आहे ती नवीन शोध, संशोधन, अभिनव कल्पना यांना वाव देणारा शैक्षणिक दृष्टिकोन स्वीकारण्याची.’ भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांनी स्वागत केले. सचिव डॉ. विश्वजित कदम यांनी प्रास्ताविक केले.

संधीचा लाभ घ्या
अकराशे वर्षांपूर्वीपर्यंत उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला या विद्यापीठांच्या माध्यमातून भारत जगाचे नेतृत्व करत होता. आज तुम्हाला आवडो न आवडो तुम्ही वैश्विक खेड्याचा भाग बनला आहात. या संधीचा लाभ घेण्यासाठी शिक्षण गुणवत्ता सुधारण्याचे आव्हान विद्यापीठांनी स्वीकारावे, असे मुखर्जी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...