पुणे - 'बारामतीत येऊन चाचा-भतीजाची गुलामगिरी मोडून काढण्याचे आवाहन करण्यापूर्वी पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी वस्तुस्थितीचा नीट अभ्यास करायला हवा होता. पण मी पंतप्रधानांना दोष देत नाही. त्यांना चुकीची माहिती दिली गेली,’ असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींना दिले.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सोमवारी ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ‘सर्वात जास्त लोकशाही पद्धतीने बारामतीमध्येच काम चालते. म्हणूनच विरोधी पक्षांच्या सभा येथे होऊ शकतात. गोपीनाथ मुंडेंपासून राजू शेट्टींपर्यंत सर्वांनी बारामतीत येऊन पवारांच्या विरोधात भूमिका घेतल्या. त्यांना कोणी अडवले नाही. मोदींच्या सभेसाठीसु्द्धा आम्हीच मैदान उपलब्ध करून दिले,’ असा चिमटाही पवारांनी काढला. बारामतीत येऊन आरोप करण्याआधी मोदींनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह देशाचे अनेक माजी राष्ट्रपती व पंतप्रधानांनी केलेले ‘बारामती मॉडेल'चे कौतुक समजावून घ्यायला हवे होते. पूर्ण बहुमत देऊन जनतेने देशाची जबाबदारी सोपविल्यानंतरही मोदी विधानसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात वेळ घालवतात, याबद्दल खंत व्यक्त करून पंतप्रधानपदाच्या कर्तव्याला त्यांनी प्राधान्य द्यायला हवे, अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली.
आघाडीबाबत आता आम्हीच ठरवणार
पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही पवारांनी टीका केली. "चार वर्षे आमच्याबरोबर सत्तेची ऊब भोगताना त्यांना काही वाटले नाही. आम्हा लोकांबरोबर बसण्यात एवढीच अडचण होती तर सत्तेला का चिकटलात?,’ असा प्रश्न त्यांनी चव्हाणांना केला. "निवडणुकीनंतर आम्ही त्यांची सोबत मागायला जाणार नाही. यायचे की नाही हे त्यांनी ठरवायचे. बरोबर घ्यायचे की नाही, हे आम्ही ठरवू.’
नुसते आरोप नकोत, थेट चौकशीच करा
'एनसीपी'चा उल्लेख 'नॅचरली करप्ट पार्टी' असा करणा-या मोदींना पवारांनी आव्हान दिले. "राष्ट्रवादीला टार्गेट केले जाते. मात्र एकही आरोप विरोधक सिद्ध करू शकले नाहीत. तुरुंगवास भोगलेल्या येदियुरप्पांना याच मोदींनी भाजपचे उपाध्यक्ष केले. त्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही. आरोप करण्यापेक्षा देशाची सत्ता हातात असलेल्या मोदींनी थेट चौकशी करावी,’ असे आव्हानच पवारांनी दिले.
मोदींच्या सभावर खर्चाची चौकशी
मोदींच्या सभांवरील खर्चावर पवारांनी संशय व्यक्त केला. "सभांच्या तयारीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. काही ठिकाणी आम्हाला ४८ लाख, ५२ लाख, एक कोटी रुपयांचे चेक दिल्याचे आढळले. आम्हाला मिळालेल्या कागदपत्रांची छाननी पूर्ण झाल्यावर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू," असे त्यांनी सांगितले.