आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Proposed Superstation Law Be Cancal : State Warkari Corporation Demand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रस्तावित अंधश्रद्धा कायदा रद्द करा : राज्य वारकरी महामंडळाची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देहू - राज्यात गोहत्या बंदी कायदा संमत होऊन अनेक वर्षे उलटल्यानंतरही राज्य शासन त्यांची अंमलबजावणी करत नाही, तर दुसरीकडे हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी जाणीवपूर्वक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्याचा घाट घालत आहे. शासनाने वारक-यांना डाऊ केमिकल विरोधातील आंदोलनाप्रमाणे रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नये. तत्काळ गोहत्या बंदी कायदा अमलात आणावा आणि प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कायमचा रद्द करण्यात यावा, अशी जोरदार मागणी ८ हजार वारक-यांनी देहू येथील महासभेत केली.


संत तुकाराम बीजेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र देहू येथे महाराष्‍ट्र राज्य वारकरी महामंडळ आणि गाथा मंदिर देहू यांच्या वतीने गाथा मंदिराच्या प्रांगणात वारक-यांची महासभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी संतवीर बंडातात्या कराडकर महाराज, रामेश्वर महाराज शास्त्री, पांडुरंग महाराज घुले, प्रकाश महाराज बोधले, संदीप महाराज हासेगावकर, नरहरी महाराज चौधरी, बापू महाराज रावकर यांची उपस्थिती होती. पांडुरंगाचा गजर करत वरील मागण्यांबरोबरच देवता आणि संत यांची विटंबना थांबवणारा कायदा व्हावा, सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करावीत, तीर्थक्षेत्रांजवळील नद्या प्रदूषणमुक्त कराव्यात आदी मागण्याचे ठराव एकमताने संमत करून शासनाकडे पाठवण्यात आले.


या वेळी बंडातात्या कराडकर म्हणाले, आम्ही संमत केलेले ठराव शासनाने मान्य करावेत. गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा वारक-यांना आपली एकजूट शासनाला दाखवून द्यावी लागेल. सरकार जर मतांसाठी राजकारण करत असेल, तर आता आम्हालाही राजकारणाचे मत पहावे लागेल. पांडुरंग महाराज घुले म्हणाले, जेथे मोठ्या प्रमाणावर गोहत्या होते त्या ठिकाणी पाप वाढल्यामुळे पर्जन्यवृष्टी होत नाही.


कायद्याला फासावर लटकवा
वारक-यांची सहमती घेतल्याशिवाय अंधश्रद्धा कायदा करण्यात येणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी शासनाने करावी, असे नरहरी महाराज चौधरी यांनी सांगितले, तर अतिरेकी अजमल कसाब आणि अफजल गुरू यांना ज्याप्रकारे शासनाने फाशी दिली. त्याप्रमाणे सरकारने नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा कायद्यालाही फासावर चढवावे, अशी मागणी प्रकाश महाराज बोधले यांनी केली.