आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं.नारायणराव बोडस यांचे पुण्यात निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. नारायणराव बोडस (वय-85) यांचे आज (सोमवार) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. भारदस्त आवाज आणि बोलक्या चेहऱ्याचे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती.  नारायणरावांच्या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव केला होता.

 

गायक नट म्हणून नारायणराव बोडस यांच्या कारकीदीर्ची सुरुवात डॉ. बी. एन. पुरंदरे लिखित 'सौभाग्यरमा' या नाटकापासून झाली. दाजी भाटवडेकर यांना या नाटकातील नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले. त्यांनी 'सं. शारदम्' या नाटकासाठी त्यांची निवड केली.

 

या भूमिका गाजल्या...

'सं. सौभद्रम्', 'पती गेले ग काठेवाडी', 'बुद्ध तिथे हरला', 'सं. मृच्छकटिक', 'सं. महाश्वेता', 'सं. मानापमान', 'सं. स्वयंवर', 'सं. सौभद', 'सं.संशयकल्लोळ', 'सं. धडिला राम तिने का वनी?', 'सुंदर मी होणार', 'मंदारमाला', 'सुवर्णतुला', 'बावनखणी', 'संत गोरा कुंभार', 'लहानपण देगा देवा', 'देव दीनाघरी धावला', 'तो एक राजहंस', 'सं. कृष्णार्जुनयुद्ध' अशा विविध संगीत व बिगर संगीत नाटकात नारायणरावांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी काही चित्रपट व टीव्ही मालिकांतूनही काम केले, पण त्यांना संगीत रंगभूमीच अधिक भावली.

 

साठीनंतर कायमची घेतली रजा..

नारायणरावांनी वयाची साठी पूर्ण झाल्यावर रंगभूमीची कायमची रजा घेण्याचा निर्णय घेतला होता. 1993 मध्ये गोव्यात 'संगीत सौभद्र'मध्ये अखेरची भूमिका साकारली होती. नंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. 12 वर्षे त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संगीत शिकवले. तेथून निवृत्त झाल्यावर 2006 सालापासून ते वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करीत होते.

 

विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱ्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला होता. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. नारायणराव बोडस यांचे चिरंजीव केदार बोडस त्यांचा वारसा पुढे नेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...