आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेहळणी आणि हेटाळणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे बॉम्बस्फोट वा मुंबईतील घातपाती कारवाया सीसीटीव्ही यंत्रणेचे व्यवस्थापन नीट नसल्यामुळे तपासात अडचणी येत नसल्याचेही निष्पन्न झाले होते. त्यामुळे सीसीटीव्हीद्वारे होणा-या टेहळणीची खूप हेटाळणीही झाली.
पुण्यामध्ये 1 ऑगस्ट रोजी कमी शक्तिशाली स्वरूपाचे चार बॉम्बस्फोट झाले. या कारस्थानामागचे सूत्रधार शोधण्यासाठी सुरू केलेल्या तपासात पुण्यातील सीसीटीव्ही (क्लोज्ड सर्किट टीव्ही) यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा मुद्दाही पुढे आला. बॉम्बस्फोट झाले त्या दिवशी पाऊस असल्याने सीसीटीव्हींद्वारे स्पष्ट चित्रीकरण होऊ शकले नव्हते. या घटनेनंतर पुण्यातील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्हींची सुसज्ज यंत्रणा बसविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने तीस कोटी रुपये मंजूर केले. पुण्यानंतर मुंबईमध्ये 11 ऑगस्ट रोजी सीएसटी येथील आझाद मैदान परिसरामध्ये समाजकंटकांनी जो हिंसाचार घडवून आणला त्याच्या तपासासाठीही या परिसरातील सीसीटीव्हीकडून झालेल्या चित्रीकरणाची मदत घेतली गेली. मुंबईवर 2008 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून झालेला भीषण हल्ला, या शहरात दहशतवादी घडवत असलेले बॉम्बस्फोट व अन्य घातपाती, हिंसक कारवाया यांच्या तपासात सीसीटीव्हीची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. मात्र, या प्रत्येक वेळी सीसीटीव्ही यंत्रणेचे व्यवस्थापन नीट नसल्यामुळे तपासात अडचणी येत असल्याचेही निष्पन्न झाले होते. त्यामुळे सीसीटीव्हीद्वारे होणा-या टेहळणीची खूप हेटाळणीही झाली.
देशात घातपाती तसेच दहशतवादी कारवाया टाळण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अधिक प्रभावी कशी करता येईल यावर आता प्रसारमाध्यमांमध्येही चर्चा सुरू झालेली आहे. सार्वजनिक महत्त्वाच्या जागा, शासकीय कार्यालये, इमारती, खासगी कंपन्यांची कार्यालये, गृहनिर्माण सोसायट्या आदी ठिकाणी सीसीटीव्ही जरूर बसवण्यात येतात; पण त्यांच्या व्यवस्थापनामध्ये अनेक त्रुटी राहून जातात. जगातील पहिली सीसीटीव्ही यंत्रणा जर्मनीतील पीनेमुंडे येथे सीमेन्स एजी या कंपनीने बसवली होती. अमेरिकेमध्ये व्हेरिकॉन ही पहिली व्यावसायिक सीसीटीव्ही यंत्रणा 1949मध्ये कार्यान्वित झाली. सीसीटीव्ही यंत्रणेचा गुन्हेगारी रोखण्यासाठी जगात प्रथम वापर केला तो अमेरिकेनेच. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तर सीसीटीव्हीचा तेथील सुरक्षा व्यवस्थेतील वापर आणखी वाढला. इंग्लंडमध्ये नोरफोक येथील किंग्ज लिन येथे सर्वप्रथम सीसीटीव्ही बसवण्यात आल्याची नोंद आहे.
अनेक प्रकारचे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्यामध्ये कॉम्पॅक्ट, फिक्सड् कॅमेरा, डायरेक्शन कंट्रोलेबल मॉडेल, हाय एंड इंटेलिजंट कॅमेरा असे प्रकार आहेत. उजेडाच्या कितीही कमी जास्त स्थितीतही आपल्या समोरील आखीव क्षेत्रातल्या हालचालींचे सुस्पष्ट चित्रीकरण हे अत्याधुुनिक सीसीटीव्ही कॅमेरे करू शकतात. या कॅमे-यांमध्ये मोशन डिटेक्शन, डे-नाईट ऑ परेशन, बॅकलाईट कंपोझिशन, डायनॅमिक नॉईज रिडक्शन, अ‍ॅटोमॅटिक लेन्स कंट्रोल अशी अनेक तांत्रिक वैशिष्ट्ये असतात. सर्व प्रकारच्या हवामानामध्ये चालू शकणारी, तांत्रिक बिघाड करू शकणा-या घटकांना अवरोध करणारी, हवे त्या प्रमाणात माऊंटिंग करता येणारी जोडउपकरणेही सीसीटीव्ही यंत्रणेसाठी आता उपलब्ध आहेत. नेमक्या कोणत्या कामासाठी सीसीटीव्हीचा वापर करावयाचा आहे त्यानूसार या प्रणालीतील विविध प्रकारच्या कॅमे-यांतून आपल्याला हवे त्या प्रकारचे कॅमेरे आपण निवड करू शकतो. सीसीटीव्ही प्रणालीद्वारे टेहळणी करताना सातत्याने चित्रीकरण करणे, झालेले चित्रीकरण साठवून ठेवणे यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान हे पायाभूत आहे. या कॅमे-यांद्वारे होणारे चित्रीकरण सुस्पष्टपणे पाहाण्यासाठी फ्लॅट स्क्रीनचा वापर केला जातो. या कॅमे-यांद्वारे चित्रीकरण करण्यासाठी डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर सोबतच नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डरही विकसित करण्यात आले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमे-यांचे तीन महिन्यांहून अधिक कालावधीचे चित्रीकरण साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या हार्डडिस्कही बाजारात उपलब्ध आहेत.
सीसीटीव्हीच्या भविष्यातील मोठ्या प्रमाणावरील वापरासाठी इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) ही यंत्रणा महत्त्वाची आहे. आयपी तसेच इथरनेट लोकल एरिया नेटवर्क (लॅन) यांची व्यापकता, लवचिकता, कार्यक्षमता, त्याचप्रमाणे या प्रणालींसाठी तुलनेने येणारा कमी खर्च यामुळे या तंत्रज्ञानाच्या आधारे सीसीटीव्ही यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यासाठी खूपच फायदा होणार आहे. त्यामुळे एखाद्या इमारतीत सीसीटीव्ही यंत्रणा बसविताना लॅन/आयपीचा वापर करता येऊ शकतो किंवा दूर पल्ल्यावर नजर ठेवायची असल्यास वाईड एरिया नेटवर्क (वॅन) ही तंत्रज्ञान प्रणालीही वापरता येऊ शकते. सीसीटीव्ही यंत्रणा बसविल्यानंतर जे चित्रीकरण झाले आहे त्याचे बारकाईने निरीक्षण करणे या प्रक्रियेला व्हिडिओ कन्टेन्ट अ‍ॅनालिसीस म्हणतात. सीसीटीव्ही यंत्रणेमध्ये केवळ कॅमे-याने चित्रीकरण करणे एवढेच आता अभिप्रेत राहिलेले नाही. त्या जोडीला फायर, इंट्र्यूजन अलार्म, कम्युनिकेशन, अ‍ॅक्सेस कंट्रोल सिस्टिम विकसित करणारी जोडउपकरणेही उत्पादकांनी विकसित केली आहेत. त्यांची सीसीटीव्ही यंत्रणेत वापर केला जातो. सीसीटीव्हीद्वारे करण्यात आलेले चित्रीकरण हा न्यायालयात सबळ पुरावा म्हणूनही ग्राह्य धरण्यात येतो.
भारतातील सर्व विमानतळांवर तर सीसीटीव्ही आहेतच. महाराष्ट्रात मुंबईतील विधानभवनात पाच वर्षांपूर्वीच सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. आपल्याकडे एखादी यंत्रणा सुरु केली की तिच्या व्यवस्थापनाकडे नीट लक्ष दिले जात नाही. दुर्घटना टाळण्यासाठी सीसीटीव्हीद्वारे जी टेहळणी चालते, त्या चित्रीकरणाचे नीट विश्लेषण करण्याचे प्रशिक्षणही ही यंत्रणा हाताळणा-या कर्मचा-यांना बहुतांश ठिकाणी मिळालेले नसते. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर मगच सीसीटीव्ही चित्रीकरणातून आरोपींचे काही धागेदोरे मिळतात का यासाठी धावपळ केली जाते. सीसीटीव्ही यंत्रणा बसविताना पुढील काही गोष्टींवर बारीक विचार करणे आवश्यक आहे. (1) सीसीटीव्ही प्रणालीत विविध प्रकारचे कॅमेरे असल्याने आपण नेमके कोणत्या प्रकारचे कॅमेरे वापरणार आहोत. (2) या कॅमे-यांची कार्यप्रणाली नेमकी कशी आहे (3) या कॅमे-यातून नेमकी कोणत्या गोष्टीची टेहळणी करायची आहे (4) टेहळणीसाठी ठरविलेले जास्तीत जास्त क्षेत्र कॅमे-याच्या लेन्सच्या टप्प्यात आणणे (5) कॅमेराने केलेले चित्रीकरण ट्रान्सफर करण्यासाठी केबल, वायर्ड किंवा वायरलेस यापैकी कोणते माध्यम वापरायचे आहे. (6) ट्रान्समीशनचा प्रकार (7) कम्पॅरिझन रेशो (8) मॉनिटरिंग स्टेशनचे ठिकाण (9) सीसीटीव्ही यंत्रणा हाताळणा-या लोकांना देण्यात येणारे योग्य प्रशिक्षण. (10) सीसीटीव्ही मार्फत करण्यात येणारे व्हिडिओ चित्रीकरण व माहिती ट्रान्सफर होण्यासाठी योग्य क्षमतेचे बँडविड्थ उपलब्ध असणे. या गोष्टी सुनियोजित रितीने मार्गी लागल्या तरच सीसीटीव्ही यंत्रणेचे व्यवस्थापन उत्तम राखता येईल. पुणे बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणेच्या उपयुक्ततेबद्दल किंवा त्या विषयी नकारात्मक बोलणा-यांनी या सा-या गोष्टी ध्यानात घेऊन मगच चर्चा करावी हे उत्तम.