आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा प्रयोग: पुणे आकाशवाणीवर ब्रेल लिपीतून बातम्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या बातम्यांचे प्रसारण सुरू होते. वृत्तवाचक बातम्या वाचत असतात, पूर्वार्ध संपतो आणि एक वेगळाच आवाज बातमीपत्राचा उत्तरार्ध वाचू लागतो. आकाशवाणीच्या रोजच्या श्रोत्यांना हा फरक लगेच जाणवतो.. हा फरक खराच असतो. कारण बातमीपत्राचा उत्तरार्ध ब्रेल लिपीत वाचणारी व्यक्तीही निराळीच असते..

दृष्टिहीनांसाठी ब्रेल लिपीचा शोध लावणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ लुई ब्रेल यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून साेमवारी पुणे आकाशवाणीने हा अनोखा योग जमवून आणला. या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या सकाळच्या प्रादेशिक बातम्या राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित केल्या जातात आणि या बातमीपत्राला सर्वोच्च श्रोतावर्गही असतो. हे लक्षात घेत पुणे आकाशवाणीतर्फे हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. ‘पुणे ब्लाइंड मेन्स असोसिएशन’चे धनराज पाटील यांनी ब्रेल लिपीतील बातम्यांचे थेट प्रसारणात वाचन केले. आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रांच्या इतिहासात प्रथमच अशी व्यवस्था करण्यात आली. अाकाशवाणीवर नियमित बातम्या एेकणाऱ्या श्राेत्यांनीही या प्रयाेगाचे स्वागत केले अाहे.

परवानगी घेऊन विशेष बातमीपत्राचे प्रसारण
>लुई ब्रेल यांच्या जयंतीदिनी अशा प्रकारचा उपक्रम करण्याबाबतचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वीच ‘ब्लाइंड मेन्स असोसिएशन’च्या वतीने माझ्याकडे आला होता. मला ती कल्पना आवडली. त्यामुळे माझ्या सकारात्मक शिफारशीसह मी तो प्रस्ताव दिल्लीच्या मुख्य कार्यालयात पाठवला. त्यांनीही अन्य नियम बाजूला सारून अशा प्रसारणाला परवानगी दिली. त्यानंतर रोजच्या बातमीपत्रामधील बातम्या कशा पद्धतीने वाचल्या जातात, याचा सराव धनराज पाटील यांनी केला आणि सोमवारी त्यांच्या आवाजात ब्रेलमधील बातम्यांचे थेट प्रसारण केले गेले.
-नितीन केळकर, वृत्तसंपादक, पुणे आकाशवाणी