आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात पॅराग्लायडरकडून पुणे विमानतळाची टेहळणी?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अज्ञात हवाई छत्रीधारकांकडून (पॅराग्लायडर) भारतीय वायुसेनेच्या पुण्यातील विमानतळाभोवती घिरट्या घालण्याचे प्रकार उजेडात आल्याने शहराच्या सुरक्षेविषयी पुन्हा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘जुन महिन्यात दोन अज्ञात हवाई छत्रीधारक पुणे विमानतळाभोवती घिरट्या घालीत होते. त्यांचे वर्तन संशयास्पद होते मात्र, त्यांची ओळख पटू शकली नाही. त्या अज्ञात हवाई छत्रीधारकांचा शोध घेतला जावा,’ अशी मागणी करणारे पत्र वायुसेनेच्या पुणे विमानतळ अधिक-यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे गोपनीय पत्र दिल्लीतून माध्यमांच्या हाती लागल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.
बेस्ट बेकरी स्फोटाबरोबरच नुकत्याच झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने पुणे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शहरातील स्थलसेना आणि वायुसेनेचे महत्त्वाची कार्यालयेही त्यांच्या निशाण्यावर आहेत. गुरूवारी पहाटे पाकिस्तानी वायुसेनेच्या महत्त्वाच्या विमानतळावर दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळाभोवती टेहेळणी करणा-या अज्ञात हवाई छत्रीधारकांचा मुद्दा गांभीर्याने घेतला गेला आहे. शहरातील विमानतळ वायुसेनेचा आहे. याच विमानतळावरुन प्रवासी वाहतूक देखील केली जाते. त्यामुळे या अज्ञात हवाई छत्रीधारकांचे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गृह मंत्रालयाकडून या संदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.