आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: बोपखेलमध्ये जमावबंदी; 189 अटकेत, 800 ग्रामस्थांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) हद्दीतील बोपखेलगाव ते दापोडी हा बंद करण्यात आलेला रस्ता पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनास गुरुवारी हिंसक वळण लागल्यानंतर आज तेथे जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. याअंतर्गत आतापर्यंत 76 महिलांसह 189 जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर, 800 ग्रामस्थांविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
गावात जाण्याचा रस्ता बंद केल्याने बोपखेलमधील संतापलेल्या नागरिकांना ताळ्यावर आणण्यासाठी पोलिसांनी महिला, मुले व नागरिकांवर अमानुष लाठीमार करत अश्रुधुराचे गोळे फोडले होते. गुरुवारच्या या घटनेत तीन पोलिस कर्मचा-यांसह सुमारे 50-60 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, बोपखेल गावात कालपासून शेकडो पोलिस कर्मचारी गावात तळ ठोकून असल्यामुळे गावाला छावनीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गावक-यांमध्ये तणावाचे आणि दहशतीचे वातावरण आहे. गावातील सर्व दुकानं बंद असल्याने गावच्या दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम झालेला दिसून येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘सीएमई’च्या हद्दीतील बोपखेलगाव ते दापोडी हा रस्ता लष्कराने आठ दिवसांपासून गावकर्‍यांसाठी बंद केला आहे. त्यामुळे अडीच किलोमीटरचा रस्ता सोडून नागरिकांना गावात जाण्यासाठी 15 किलोमीटरचा वळसा मारावा लागत आहे. बंद करण्यात आलेला रस्ता सुरू राहावा यासाठी बोपखेलच्या नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली. त्यासाठी गुरुवारी त्यांनी मोठ्या स्वरूपात आंदोलन पुकारत सीएमईच्या प्रवेशद्वारातून आत घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी सीएमईचे जवान व पोलिसांनी नागरिकांना प्रवेशद्वाराच्या आत येण्यास बंदी घातली होती. त्यामुळे जमाव प्रक्षोभक झाला होता.
नागरिकांची दगडफेक-
पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार व महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. मात्र, नागरिक दाद देत नसल्याने पोलिसांनी लाठीमार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जमाव प्रक्षोभक होऊन त्यांनी पोलिस व लष्करी जवान यांच्यावर दगडफेक सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून तसेच गोंधळ घालणार्‍या काही जणांना ताब्यात घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
आदेशानुसारच रस्ता बंद-
‘सीएमई’ परिसरात विविध लष्करी संस्थांच्या इमारती, प्रशिक्षणाची साधने व गोदाम असून ते संवेदनशील असल्याने त्याची सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे. बोपखेल, रामनगर, गणेशनगर हे ‘सीएमई’च्या पूर्वेला वसलेले असून ते बंदिस्त झालेले नाही. त्यांना नाशिक- पुणे महामार्ग तसेच पुणे शहराकडून जाण्यासाठी रस्ता आहे. नागरिकांना जाणे-येण्याची सुविधा, जमिनीची कागदपत्रे, सुरक्षा या बाबींची तपासणी करून उच्च न्यायालयाने 21 एप्रिल रोजी आदेश देऊन ‘सीएमई’तून जाणारा रस्ता बंद करण्यास सांगितले आहे. त्यानुसार, सामान्य नागरिकांसाठी 13 मे पासून हा रस्ता बंद करण्यात आला असून हा रस्ता केवळ अतितत्काळ वैद्यकीय सेवेसाठी वापरण्यात यावा असे स्पष्टीकरण सीएमईने दिले आहे.
पुढे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा, गुरुवारी पोलिस व ग्रामस्थांत कशी झाली धुमश्चक्री...
बातम्या आणखी आहेत...