आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pune Blast Inquiry Going Right Direction Says Home Minister Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे स्फोटाचा तपास योग्य दिशेने; संशयितांचा संबंध बॉम्बस्फोटाशी जोडू नये- गृहमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- आर आर पाटील)
पुणे- पुणे स्फोटाचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. मात्र, देशात इतर ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या बॉम्बस्फोटातील संशयितांचा याच्याशी संबंध जोडू नये असे गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटले आहे. याबाबत योग्य व सत्य माहिती केवळ दहशतवादीविरोधी पथकच देईल. पुण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 240 कोटींचा निधी मंजूर आहे. वाहतुकीच्या अडचणीमुळे हे काम जलद गतीने पूर्ण करता आले नाही. मात्र महिन्याभरात म्हणजेच गणेशोत्सवापर्यंत झोन-1 मधील संवेदनशील जागांवर सीसीटीव्ही लावलेले असतील असेही पाटील यांनी सांगितले.
पुणे स्फोटातील संशयित हे अहमदाबाद व मुंबईतील बॉम्बस्फोटातील असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांकडून दिली जात आहे. याबाबत आबांना विचारले असता त्यांनी वरील वक्तव्य केले. जेव्हा गंभीर घटना घडतात तेव्हा नागरिकांत उलट-सुलट चर्चा होत असते. त्यामुळे लोकांनी कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये. दहशतवादीविरोधी पथक जी माहिती देईल त्यानुसारच वृत्त द्यावीत असे मतही त्यांनी व्यक्त केले. पुणे स्फोटातील जखमींच्या औषधोपचारांचा सर्व खर्च शासन करीत आहे.
दोन वर्षापूर्वीच पुण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय झालेला असताना अद्याप ते का बसविले गेले नाहीत यावर आबा म्हणाले, सरकारने 240 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. त्याचे काम सुरु आहे. मात्र पुण्यातील वाहतूकीच्या समस्येने अद्याप फक्त 40 टक्के काम होऊ शकलेले आहे. मात्र, गणेशोत्सवापूर्वी झोन- 1 मधील सर्व संवेदनशील ठिकाणी कॅमेरे बसविलेले असतील असे पाटील यांनी सांगितले. झोन-1 मध्ये पुण्यातील मध्यवर्ती भागांचा समावेश आहे. तसेच तेथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बहुतेक मानाचे गणपती व लोकांच्या गर्दीची ठिकाणी याच झोन मध्ये मोडतात. त्यामुळेच झोन-1 मध्ये महिन्याभरात सर्व आवश्यक ठिकाणी कॅमेरे बसवलेले असतील.
कल्याणमधील चार युवक दहशतवादी कारवायात सहभागी झाल्याचे पुढे येत आहे यावर गृहमंत्री म्हणाले, संबंधित युवकाच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. हा विषय मोठा आहे. त्यामुळे गुप्तचर संघटना व राष्ट्रीय तपास यत्रंणाची याकामी मदत घेतली जाईल. मात्र, अद्याप हे तरूण दहशतवादी कृत्यात सहभागी झाल्याचे पुढे आलेले नाही.