पुणे- पुण्यातील न-हे-आंबेगाव हद्दीत शुक्रवारी पहाटे कोसळलेल्या सहा मजली इमारतीच्या सहाव्या मजल्याचे बेकायदा बांधकाम केल्याने व इमारत बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे तपासात पुढे आले आहे. याचबरोबर बांधकाम पूर्णत्त्वाचा दाखला दिला नसतानाही बिल्डराने रहिवाशांना फ्लॅटचा ताबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या इमारतीच्या दुर्घटनेला जबाबदार धरत व एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणाच्या मृत्यूप्रकरणी बिल्डरावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या इमारतीत एकून 8 कुटुंबे राहत होती. यात काही फ्लॅटमालक होते तर काही भाडेकरू राहत होते. या दुर्घटनेत संदीप दिलीप मोहिते (29) या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. इमारत बांधलेल्या जागेत पूर्वी विहीर व खड्डा होता अशी माहिती पुढे येत आहे. त्यातच निकृष्ट बांधकाम केल्याने नविनच इमारत पत्त्यासारखी कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. बिल्डर किशोर वडगामा आणि प्रकाश खंदारे यांना अटक करण्यात आली आहे.
वडगामा व खंदारे यांनी
आपल्या 'व्ही. के. असोसिएट' या भागीदारीतील बांधकाम कंपनीच्या माध्यमातून दीड वर्षापूर्वी ही इमारत बांधली होती. यात बेसमेंट व पहिल्या मजल्यावर पार्किंगची सोय तर वरील चार मजल्यावर रहिवासासाठी फ्लॅट काढले होते. या इमारतीत एकून 20 फ्लॅट होते. त्यातील आठ फ्लॅटमध्ये लोक राहत होते. तीन फ्लॅटमालक व 5 भाडेकरू राहत होते. दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा अनिधकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यात तळजाई पठारावर घडलेल्या घटनेनंतर आता न-हे-आंबेगावात झालेल्या दुर्घटनेने सर्वाचे पुन्हा एकदा डोळे उघडले आहेत.