पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्याप्रकरणात सनातन संस्थेचे पुण्यातील संशयित साधक हेमंत शरद शिंदे (रा.शिवाजीनगर, पुणे) व नीलेश मधुकर शिंदे (रा.मंगळवार पेठ, पुणे) यांची पाॅलिग्राफ चाचणी करण्यास पुणे न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली आहे. दाेन्ही साधकांनीही यास मान्यता दिल्यानंतर न्या. शीतल बांगड यांनी सशर्त परवानगी दिली.
ही चाचणी घेण्यापूर्वी त्याची तारीख अाणि वेळ याची माहिती ४८ तास अगाेदरच दाेघांना द्यावी. तसेच या चाचणीच्या वेळी त्यांचे डाॅक्टर व वकील यांना हजर राहण्यास न्यायालयाने परवानगी दिली.बेलापूर येथील सेंट्रल सायन्स फाॅरेन्सिक लॅबमध्ये ही चाचणी घेण्यात येणार असून त्या वेळी सीबीअायच्या तपास अधिकाऱ्यांनी सर्वाेच्च न्यायालयाने पाॅलिग्राफ चाचणी घेण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले अाहेत.